बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली आहे. या हत्येतील एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. मस्साजोगचे ग्रामस्थ हे चांगलेच संतापल्याचे बघायला मिळाले. संतोष देशमुख यांचे बंधू आणि ग्रामस्थांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. वाल्मिक कराडवर मकोका लावण्याच्या मागणीसाठी प्रमुख हे आंदोलन करण्यात आले. आता वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला. दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे हे परळीत दाखल झाले असून पुढील काही दिवस त्यांचा मुक्काम येथेच राहणार आहे.
राजकिय दबावामुळे खोटे गुन्हे हे वाल्मिक कराडवर दाखल केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. परळीत काल बंद पाळण्यात आला. वाल्मिक कराडचे समर्थक रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले. वाल्मिक कराडच्या आई यांनीही पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. परळीतील परिस्थितीवर प्रशासनाचे पूर्ण लक्ष आहे. अजित पवार यांची भेट घेऊन धनंजय मुंडे हे परळीला निघाले. ते रात्री परळीत पोहोचले. यावेळी धनंजय मुंडे यांनी स्पष्ट सांगितले की, परिस्थिती शांत झाल्यावर आपण यावर बोलणार आहोत. परळीत तणावाचा परिस्थिती असल्याने धनंजय मुंडे यांचा मुक्काम पुढील काही दिवस परळीतच असणार आहे. त्यांनी अगोदरच स्पष्ट केले की, परिस्थिती शांत झाली की, आपण बोलू. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.