---Advertisement---

लाडकी बहिण योजनेची मंत्री तटकरेंनी दिली मोठी अपडेट !

By team
On: June 3, 2025 4:02 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागून राहिलेल्या लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट दिले आहे. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून, मे महिन्याचा हप्ता लवकरच महिलांना मिळणार आहे, असे स्पष्ट करत महिलांना दिलासा दिला आहे.

अदिती तटकरे म्हणाल्या की, या योजनेबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. चार महिन्यांपूर्वीच्या तपासणीत आढळले होते की काही सरकारी महिला कर्मचारीही या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे अशा लाभार्थींना तात्पुरता लाभ थांबवण्यात आला होता. तरीही, सर्व पात्र महिलांना हप्ता लवकरच दिला जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केल्याने लाखो महिलांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या वट पौर्णिमेला लाडक्या बहिणींना पैसे मिळतील अशी चर्चा सुरू झाली आहे.

महिला आयोगाच्या कार्यपद्धतीच्या बैठकीसंदर्भात बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या, महिला आयोगासंदर्भातील बैठकीला काहींना निमंत्रित करता आले नाही. बैठकीतून काही सूचना येतील त्यावर कार्यवाही करू. काही बदल करण्याच्या सूचना आल्या तर त्या अंमलात आणू. महायुतीतून कुणी वैयक्तीक टीका केलेली नाही. महिला आयोगाच्या मर्यादा लक्षात घेणे गरजेचे आहे. सूचनांचा विचार नक्की करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यातल्या काही सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवून या योजनेचा लाभ घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यासंदर्भात 1,60,559 महिला-पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली, त्यामधून 2,652 महिला कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. शासन निर्णयात स्पष्ट नमूद असूनही, सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही, तरीही संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी अर्ज भरून अनधिकृतपणे पैसे उचलल्याचे उघड झाले आहे.

या महिलांमध्ये वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांचा मोठा समावेश आहे. याशिवाय, सहा लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची आणखी तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. तसेच, आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, 8 लाख 85 हजार महिलांनी ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ आणि ‘लाडकी बहीण योजना’ या दोन्ही योजनांचा लाभ घेतल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शासनाकडून योजनेच्या लाभार्थ्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, पुढील कारवाईची शक्यता आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!