सातारा : वृत्तसंस्था
राज्यातील साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले नेहमीच आपल्या वेगळ्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत येत असतात, पण सध्या खासदार उदयनराजे यांनी अभिनेते निळू फुले यांची मिमिक्री केल्याने मोठ्या चर्चेत आले आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर उदयनराजेंनी विधानसभा मतदारसंघ निहाय आभार दौरा केला. यावेळी एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी निळू फुलेंची मिमिक्री केली त्यानंतर उपस्थितीतांमध्ये एकच हशा पिकला. उदयनराजेंचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत साताऱ्यात विजय मिळवल्यानंतर सध्या उदयनराजे हे अनेक कार्यक्रमात हजेरी लावत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी कोणी कितीही शड्डू ठोका, साताऱ्याचे राजकारण मी आणि शिवेंद्रराजे करणार असे म्हणत दंड थोपटले होते.
तसेच एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी ओबीसी- मराठा संघर्षावर देखील भाष्य केले आहे. जातनिहाय जनगणनेची मागणी उदयनराजे यांनी केली आहे. जाती – जातींमध्ये दुफळी निर्माण झाली ती मिटवून जातीच्या आधारे आरक्षण द्या. एकदाची जातनिहाय जनगणना करून ज्यांना त्यांना वाट्याप्रमाणे आरक्षण देऊन टाकावे अशी भूमिका त्यांनी मांडली होती.