---Advertisement---

हगवणे बापलेकांच्या फसवणुकीचे नवे प्रकरण : १२ लाखांची केली फसवणूक !

By team
On: May 30, 2025 10:30 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून हुंडाबळीमुळे अटकेत असलेले पुण्यातील हगवणे बापलेकांच्या विरोधात आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बापलेकांच्या फसवणूक आणि गुंडगिरीच्या मालिकेला काही केल्या पूर्णविराम मिळताना दिसत नाही. आपल्या सुनेचा मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात आधीच तुरुंगात असलेले शशांक व राजेंद्र हगवणे यांच्यावर आता आणखी एका नागरिकाने मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

खेड तालुक्यातील निगोजे गावचे रहिवासी प्रशांत येळवंडे यांनी हगवणे कुटुंबीयांविरुद्ध महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, तब्बल ११ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट केले आहे. मार्च २०२२ मध्ये लता व शशांक हगवणे यांच्याकडून प्रशांत येळवंडे यांनी २४ लाख रुपयांचा जेसीबी खरेदी करण्याचा व्यवहार केला होता. त्या वेळी त्यांनी ५ लाख रुपये देऊन जेसीबी ताब्यात घेतला. मात्र, संबंधित वाहनावर इंडसइंड बँकेचे १९ लाखांचे कर्ज असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशांत यांनी उर्वरित हप्त्यांसाठी दरमहा ५० हजार रुपये देण्याचे मान्य केले आणि एकूण ६.७० लाख रुपये लता हगवणे यांच्या खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर केले.

मात्र, हगवणे कुटुंबीयांनी बँकेचे हप्ते न भरता ती रक्कम स्वतःसाठी वापरली. परिणामी, बँकेने ऑगस्ट २०२४ मध्ये जेसीबी जप्त केला. नंतर हगवणे यांनी ते वाहन परत सोडवून घेतले, पण प्रशांत येळवंडे यांना पुन्हा ताब्यात दिला नाही.

जेव्हा प्रशांत येळवंडे यांनी आपली रक्कम किंवा जेसीबी परत मागण्यासाठी प्रयत्न केले, तेव्हा शशांक हगवणे यांनी कमरेला पिस्तूल लावून “तू मशीन १४ महिने वापरली आहे, आता पैसे मागू नको, नाहीतर घरचे नीट राहणार नाहीत,” अशी धमकी दिली. या प्रकारामुळे वैतागलेल्या येळवंडे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणातील आरोपी शशांक व राजेंद्र हगवणे हे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात देखील गुन्हेगार असून, सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्या प्रकरणात सुनेचा छळ, मारहाण, आणि मृत्यूपूर्वीच्या जखमा यामुळे त्यांनी समाजात दहशत निर्माण केली आहे. हगवणे बापलेकांच्या गुन्हेगारी वर्तनामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. आता जेसीबी फसवणूक प्रकरणात काय कारवाई होते आणि या आरोपांमुळे त्यांच्या शिक्षेमध्ये कितपत वाढ होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!