ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट बस स्थानकाच्या जुन्या आठवणी इतिहास जमा

नव्या बस स्थानकाचे काम प्रगतीपथावर

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

शहरात एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल २९ कोटी रुपये खर्च करून होत असलेल्या बस स्थानकाचे काम प्रगतीपथावर असून आता जुन्या बस स्थानकाचे पाडकाम पूर्ण झाले आहे. या पाडकामुळे बस स्थानकाचा परिसर सपाट दिसत असून या कामाच्या निमित्ताने जुन्या बस स्थानकाच्या आठवणी मात्र इतिहास जमा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.या नव्या बांधकामाकडे बघून प्रवासी देखील आपल्या जुन्या आठवणींना याठिकाणी उजाळा देत आहेत.कोणतीही एखादी महत्त्वाची वास्तू ज्यावेळी नूतनीकरणासाठी येते आणि ती पूर्णपणे पाडली जाते.त्यावेळी त्या वास्तु विषयीच्या आठवणी समोर येणे आणि त्यांना उजाळा मिळणे हे स्वाभाविकच आहे.

गेल्या पन्नास वर्षापासून जुन्या अक्कलकोट बस स्थानकाचा जिव्हाळा हा तालुक्यातील प्रवासी वर्गाला लागला आहे अर्थात हे बस स्थानक फार जुने झाले होते.जीर्ण झालेले होते.ठिक- ठिकाणी गळती लागलेली होती. इमारत पण अतिशय धोकादायक झालेली होती.या पार्श्वभूमीवर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारच्या माध्यमातून या बस स्थानकासाठी २९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आणि त्या माध्यमातून हे काम सुरू झाले.

सध्या या नव्या बांधकामासाठी बाजूचा हा संपूर्ण परिसर नो पार्किंग झोन करण्यात आला आहे आणि पत्र्याचे कंपाउंड देखील मारण्यात आले आहे.कोणीही आतमध्ये येऊ नये याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे आणि आत मध्ये हे काम वेगाने सुरू आहे. खरे तर राज्यातील तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेल्या शहरातील अनेक बसस्थानके ही बसपोर्ट झाली.मात्र पाच दशकापूर्वी बांधण्यात आलेले अक्कलकोटचे बसस्थानक मात्र यापासून वंचित होते.राज्यातील टॉप फाईव्ह मधील तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र अक्कलकोटचे नाव घेतले जाते. राज्यासह, परराज्य, परदेशात अक्कलकोटचे नाव असताना श्री स्वामी समर्थांची नगरी मात्र यापासून कोसोदूर राहिली.आमदार कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून हे काम पूर्ण होताना पहायला मिळत आहे.या अक्कलकोट बसस्थानकाचा विषय तर अनेकवेळा राज्याभर गाजला.आता पर्यंत बसस्थानकाच्या किरकोळ दुरुस्ती शिवाय कोणतीच सुधारणा त्या ठिकाणी झालेली नव्हती.बसस्थानकाच्या जागेची मोठी तांत्रिक अडचण होती.हा विषय आता न्यायालयाच्या माध्यमातून मार्गी लागला आहे.आता मात्र हे काम लवकर पूर्ण व्हावे,अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

तात्पुरत्या बस स्थानकात गैरसोयी
नव्या तात्पुरत्या बस स्थानकातील प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. त्या ठिकाणी ठेकेदार किंवा प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीबाबत योग्य ती खबरदारी घेतली नाही. त्यामुळे आता पावसाळ्यात संपूर्ण पाणी हे बस स्थानकात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत याबाबत योग्य ती खबरदारी महामंडळाने आत्ताच घ्यावी,अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!