---Advertisement---

सैफवर हल्ला केवळ चोरीच्या उद्देशाने ; गृहराज्य मंत्री योगेश कदम

By team
On: January 16, 2025 3:06 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून चाकूने हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशिरा मुंबईतील खार येथील सैफच्या अपार्टमेंटमध्ये पहाटे दीडच्या सुमारास ही घटना घडली. अभिनेत्याच्या मानेवर, पाठीवर, हातावर आणि डोक्यावर 6 ठिकाणी वार करण्यात आले होते. या घटनेनंतर सैफला दुपारी 2 वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आले होते.

राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला हा खुनाच्या नव्हे तर चोरीच्या उद्देशाने झाल्याचे स्पष्ट केले. तसेच विरोधकांना या घटनेला धार्मिक रंग न देण्याचे आवाहनही केले. या प्रकरणी एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोराचा चेहरा दिसला आहे. त्यामुळे या घटनेला कोणत्याही पद्धतीचा धार्मिक किंवा गँगवॉरचा रंग देणे चुकीचे ठरेल. सैफचे आडनाव केवळ खान आहे म्हणून विरोधक त्याचे राजकारण करत असतील तर मला त्यांची किव येते, असे त्यांनी म्हटले आहे.
योगेश कदम गुरुवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, अभिनेता सैफ अली खान यांचे आडनाव केवळ खान आहे म्हणून विरोधक त्याचे राजकारण करत असतील तर मला त्यांची किव येते. महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला सत्तेच्या बाहेर फेकले आहे. तुम्ही आता विरोधी बाकावर आहात म्हणून काहीही बरळाल हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यावरून त्यांची राजकीय परिपक्वता किती हे लक्षात येते. आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गृहखाते काम करत असताना मुंबई हे जगातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून आजही ओळखले जाते.

सदर इमारतीत पोलिसांची कोणतीही सुरक्षा नव्हती. तिथे केवळ खासगी सुरक्षा रक्षक होते. सैफ अली खानचे घर 4 माळ्यांचे आहे. या चारही माळ्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे जास्त प्रमाणात नव्हते. त्यामुळे यासंबंधीचा डेटा व फुटेज मिळण्यास उशीर झाला. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोराचा चेहरा समोर आला आहे. त्यामुळे या घटनेला कोणत्याही पद्धतीचा धार्मिक किंवा गँगचा रंग देणे चुकीचे ठरेल. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणाला केवळ चोरीचा अँगल आहे. या घटनेप्रकरणी न्यायवैद्यक शाखेने गोळा केलेले पुरावे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. त्याच्या तपासानंतर योग्य ती माहिती प्राप्त होईल. पण प्राथमिक तपासात ही घटना चोरीची वाटत आहे. चोर खून करण्याच्या उद्देशाने घरात शिरल्याचे वाटत नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे. चोर घरात शिरल्यानंतर जशी झटापट होते त्या प्रमाणे ही घटना घडली असावी असा अंदाज आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!