बीड : वृत्तसंस्था
राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरु झाली असून त्यात बीड लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत होणार आहे. कारण, भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून थेट पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने बजरंग सोनावणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. सध्या दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू असून एकमेकांवर टीकेचा भडीमार केला जात आहे.
गुरुवारी (ता. २) पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील आसरडोह येथे जाहीर प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ज्या पक्षाचे साडेतीन खासदार येणार नाहीत, त्या पक्षासाठी 350 खासदार येणाऱ्या पक्षाला लाथ मारू नका, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी मतदारांना केलं. मी समाजा-समाजामध्ये भिंती बांधण्यासाठी नाही तर त्या पाडण्यासाठी राजकारणात आले आहे. मुस्लिमांच्या केसालाही धक्का लागणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. त्यामुळे अशा बुद्धीभेताला तुम्ही बळी पडू नका, अशी हमी देखील पंकजा मुंडे यांनी मुस्लिम मतदारांना दिली.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “विरोधक उगीच बुद्धिभेद करतील, खतरा आहे म्हणतील, मात्र १० वर्षात किसी को छुआ? किसी को कुछ हुआ? नही ना. कुणी म्हणतील हा कायदा, तो कायदा. कुठलाच कायदा होणार नाही. इथल्या प्रत्येक मुस्लिमांचा देशावर अधिकार आहे”. “तुमच्यावर आलेलं प्रत्येक संकट परतून लावण्यासाठी मी ढाल बनून उभी आहे. तुम्ही देखील माझ्या ढालीला मजबूत करा. तरच भविष्यात आपल्याला राजकारण करणे शक्य होईल. आज आपल्यासमोर विकासाचं ताट वाढून ठेवलंय ते असं उधळून लावू नका, असंही पंकजा म्हणाल्या.
आता दिवस बीड जिल्ह्याचे आहेत. काहींनी आमच्या जिल्ह्यात येऊन जातीपातीचे राजकारण केलं. मात्र, मला विकास करताना कोणाला विचारायची गरज आहे का ? मी पहिल्या रांगेत बसणारी राजकारणी आहे. असं देखील पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.