परभणी : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती तर दुसरीकडे आज परभणी शहरामध्ये विविध मागण्यासाठी सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय, सर्व जाती – धर्मीय नागरिक सहभागी झाले. नूतन महाविद्यालय येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये राज्यभरातील प्रमुख नेत्यांनी सहभाग घेतला.
धनंजय देशमुख हे पोलिस ठाण्यात गेले असता त्यांना धमकी देण्यात आली. मात्र, यापुढे त्यांच्या कुटुंबीयांना आणि धनंजय देशमुखांना धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने देखील फिरु देणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आजपर्यंत आम्ही त्यांचे नाव देखील घेतले नाही. मात्र देशमुख कुटुंबियांना त्रास झाला तर एकाला देखील रस्त्याने फिरू देणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. या पुढच्या काळात लोकांना त्रास दिला तर परभणी जिल्हा असो किंवा धाराशिव जिल्हा, त्यांना फिरु देणार नसल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. आम्हाला माज किंवा मस्ती नाही. मात्र जर आमची लेकर उघड्यावर पडत असतील तर आम्ही थांबणार नसल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. हत्या प्रकरणातील आरोपींना पुण्यात नेमके कोणी सांभाळले? सर्व आरोपी पुण्यातच कसे सापडले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारमधील मंत्रीच आरोपींना सांभाळत असल्याचे दिसते, असे देखील ते म्हणाले.
आमदार सुरेश धस यांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात का घेतले? असा प्रश्न सुरेश धस यांनी उपस्थित केला. आतापर्यंच्या हत्येची बेरीज करा, त्या कोणी घडवून आणल्या, त्याच्या मागचा मास्टरमाईंड कोण? हे जर तुम्हाला माहीत नसेल तर परभणीला आणि बीडला बारामतीची माणसे पाठवा, असे आवाहन देखील धस यांनी केली आहे. हा सर्व प्रकार केवळ एका समाजापुरता मर्यादीत नाही. इतर सर्व समाजाला तिथे काय वागणूक मिळते, ते पहा, असे आव्हान देखील सुरेश धस यांनी अजित पवार यांना केले आहे.
बीड मधील मस्साजोग प्रकरणात सर्व आरोपींना मकोका लागायला हवा, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आकाच्या आकाचाही नंबर लागू शकतो. असे देखील सुरेश धस यांनी म्हटले आहे. ‘आका जल्दी करलो तयारी, निकलेंगे तेरी वारी’ असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. या प्रकरणात जे-जो दोशी असतील, त्यांना फाशी द्या, असे आता आका म्हणत आहेत. मात्र, आधी नीट वागायचे कोणी सांगत नव्हते का? असे देखील त्यांनी म्हटले आहे. अजित दादा ‘क्या हुआ तेरा वादा?’ असा प्रश्नही सुरेश धस यांनी अजित पवार यांना विचारला आहे.