---Advertisement---

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याच पीएम मोदी, एकनाथ शिंदेंना निमंत्रण

By team
On: July 1, 2025 5:09 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारने त्रिभाषा धोरणाचा शासकीय निर्णय (जीआर) रद्द केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी मराठी अस्मितेच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी ५ जुलै २०२५ रोजी वरळी डोम येथे भव्य विजयी मेळाव्याचं आयोजन केलं आहे.

या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार असून, हा मराठी एकजुटीचा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या मेळाव्याचं निमंत्रण देताना “महाराष्ट्राचे शत्रू आणि मराठीचे मारेकरी” अशी खरमरीत टीका करत खुलं आव्हान दिलं आहे.

महाराष्ट्र सरकारने शाळांमध्ये पहिल्या इयत्तेपासून हिंदीला अनिवार्य तिसरी भाषा म्हणून लागू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या त्रिभाषा धोरणाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. दोन्ही ठाकरे बंधूंनी ५ जुलै रोजी संयुक्त मोर्चाचं हत्यार उपसत सरकारविरोधात आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र, या मोर्चाआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (२९ जून २०२५) दोन्ही शासकीय निर्णय रद्द करण्याची घोषणा केली. या निर्णयाला ठाकरे बंधूंनी “मराठी जनतेचा विजय” असं संबोधत विजयी मेळाव्याचं आयोजन केलं आहे.

शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी एक्सवर मेळाव्याचं पत्रक शेअर करत पंतप्रधान मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना टॅग करत निमंत्रण दिलं. त्या “महाराष्ट्राच्या शत्रूंना आणि मराठीच्या मारेकऱ्यांना आव्हान आणि आवाज देणारी ही घडामोड आहे. यावे जागराला यावे!” असं म्हणत त्यांनी महायुती नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. राऊत यांनी या मेळाव्याला मराठी अस्मितेच्या जागराचं स्वरूप दिलं असून, सरकारच्या निर्णयाला “लोकशक्तीचा विजय” असं म्हटलं आहे.

ठाकरे बंधूंचं नागरिकांना आवाहन

उद्धव आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रक काढत मराठी जनतेला मेळाव्यासाठी वाजत-गाजत, गुलाल उधळत येण्याचं आवाहन केलं आहे. “आवाज मराठीचा! सरकारला नमवलं का? तर हो, नमवलं! कोणी नमवलं? तुम्ही, मराठी जनांनी नमवलं! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष केला. हा आनंद साजरा करताना आम्ही फक्त आयोजक आहोत, जल्लोष तुम्ही करायचा आहे!” असं पत्रकात म्हटलं आहे. हा मेळावा ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता वरळी डोम येथे होणार असून, यावेळी ठाकरे बंधूंच्या भाषणांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!