नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरातील अनेक भाविक महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराज येथे दाखल होत आहे तर आज बुधवारी दि. ५ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. त्यांनी इथल्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान आणि पूजा केली. यावेळी पीएम मोदी यांनी भगवे वस्त्र परिधान केले होते. त्यांच्या गळ्यात आणि हातात रुद्राक्षाची माळ होती. त्यांनी आज मंत्रोच्चारात संगमात आस्थेची डुबकी घेतली. त्यानंतर त्यांनी गंगापूजन केले.
”आज महाकुंभात प्रयागराज येथील पवित्र संगमात स्नान केल्यानंतर मला पूजा करण्याचे परम भाग्य लाभले. मां गंगेचा आशीर्वाद मिळाल्याने मनाला अपार शांती आणि समाधान मिळाले. यावेळी सर्व देशवासीयांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. हर हर गंगे!” अशी भावना पीएम मोदी यांनी X वरील पोस्टमधून व्यक्त केली आहे.
प्रयागराजच्या दिव्य- भव्य महाकुंभात श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा संगम कोणालाही भारावून टाकणारा आहे, असे सांगत पीएम मोदी यांनी पवित्र कुंभमेळ्यातील स्नानाचे काही फोटो शेअर केले आहेत. ”पंतप्रधान मोदी यांनी यांनी भारताची जीवनरेखा, अध्यात्म आणि संस्कृतीचा सनातन स्रोत असलेल्या माँ गंगेची विधीवत पूजा केली आणि देशवासीयांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.” असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सूर्यदेवाची आराधना केली. त्यांनी पवित्र स्नान केल्यानंतर मंत्रांचा जपही केला. पंतप्रधान मोदी महाकुंभमेळ्यात सहभागी झाल्याने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाकुंभमेळ्यात सहभागी झाले होते. त्यांनी संगमात पवित्र स्नान करुन पूजा केली होती. उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, १३ जानेवारीपासून सुरु झालेल्या या महाकुंभमेळ्यात ४ फेब्रुवारीपर्यंत ३८.२९ कोटी भाविकांनी संगमात पवित्र स्नान केले आहे. आज महाकुंभमेळ्यात पीएम मोदी सहभागी झाले.