---Advertisement---

मोहोळ तालुक्यात राजकीय तणाव शिगेला ; थिटे यांच्या उमेदवारीवरून अनगरमध्ये पोलिस बंदोबस्त !

By team
On: November 17, 2025 3:08 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

अनगर नगरपंचायत निवडणुकीतील उमेदवारी अर्जांच्या प्रक्रियेमुळे मोहोळ तालुक्यात मोठे राजकीय वादळ उठले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी अर्ज दाखल करताना अडथळे निर्माण झाल्याचा गंभीर आरोप केल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे. अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे.

घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आधीच मध्यरात्रीनंतर अनगर परिसरात जोरदार बंदोबस्त उभारला. आज सकाळी अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच नगरपंचायत कार्यालय परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. प्रचंड नागरिकांची उपस्थिती आणि कार्यकर्त्यांची गर्दी पाहता सुरक्षा यंत्रणा अलर्टवर होती.

उज्ज्वला थिटे पहाटे साडेपाचच्या सुमारास नगरपंचायत कार्यालयात पोहोचल्या. त्यांच्या सोबत सोलापूर ग्रामीण पोलिसांचा शस्त्रधारी ताफा होता. त्यांचे आगमन सोशल मीडियावर व्हायरल होताच ग्रामस्थांची मोठी गर्दी कार्यालयाबाहेर जमा होऊ लागली. सकाळी अकरा वाजता अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू होणार असली तरी त्याआधीच परिसरात तणाव निर्माण होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलिस, महिला पोलिस दल आणि शस्त्रधारी जवान तैनात करण्यात आले.

दरम्यान, थिटे यांनी भाजप नेते व माजी आमदार राजन पाटील यांच्यावर निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नाचा आरोप केला आहे. त्यांना अर्ज भरू न देण्यासाठी नियोजनबद्ध अडथळे निर्माण केल्याचा त्यांनी दावा केला. रस्त्यांवर उसाने भरलेले ट्रॅक्टर लावून मार्ग अडवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा पाठलाग करण्यात आल्याचा आरोप त्यांनी पोलिसांकडे केला आहे. योग्य संरक्षण न दिल्याबद्दल त्यांनी मोहोळ पोलिस ठाण्यासमोर संतापही व्यक्त केला होता.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीने विशेष संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मार्ग साफ करून थिटे यांना सुरक्षितरीत्या कार्यालयात पोहोचवण्यात आले. त्यांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली असली तरी त्यांचा अर्ज अंतिम स्वरूपात स्वीकारला जाईल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनगरमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या धामधूम व वाढत्या तणावामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन कडक पावले उचलताना दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!