ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सरपंच खून प्रकरणी : कराडला उद्या कोर्टात हजर करणार, तर चाटेला 14 दिवसांची कोठडी

बीड : वृत्तसंस्था

राज्यभरात गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड आणि खंडणी प्रकरणावर अनेक धक्कादायक पुरावे समोर येत असतांना नुकतेच मुख्य आरोपी विष्णू चाटे याला आज केज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी केज न्यायालयाने विष्णू चाटेची दोन दिवसांच्या सीआयडी कोठडीत रवानगी केली होती. त्याची सीआयडी कोठडी संपल्याने त्याला आज केज कोर्टात हजर करण्यात आले होते. आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 34 दिवस उलटून गेले आहेत. या काळात पोलिसांनी आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणहून ताब्यात घेतले. विष्णू चाटे हा या प्रकरणातील महत्वाचा आरोपी असून, आज त्याला न्यायालयीन कोठडी मिळणार की, पोलिस कोठडी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. केज न्यायालयात आज यावर सुनावणी पार पडली. न्यायालयाने अवघ्या काही मिनिटांतच विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावली. धक्कादायक म्हणजे आजच्या सुनावणीला सरकारी वकील बाळासाहेब कोल्ह हे अनुपस्थित राहिल्याची माहिती समोर येत आहे.

धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय मानला जाणारा वाल्मीक कराड यांच्यावरही खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. सध्या तो पोलिस कोठडीत असून त्याची कोठडी उद्या संपणार आहे. त्यामुळे उद्या दुपारी त्याला केज न्यायालयात हजर केले जाईल. वाल्मीक कराडला पुन्हा किती दिवसांची कोठडी मिळते, हे पहावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!