सोलापूर दि. १४ – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार भगवान रामपुरे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेच्यावतीने मसाप सन्मान पुरस्कार देऊन त्यांच्या गौरव करण्यात येणार आहे. येत्या रविवारी १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता विजापूर रस्त्यावरील जवान नगर येथे आनंदश्री प्रतिष्ठानच्या सभागृहात महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांच्या हस्ते हा पुरस्कार रामपुरे यांना देण्यात येईल अशी माहिती मसाप जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी दिली.
भगवान रामपुरे यांनी शिल्पकलेच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे. आपल्या शिल्पकलेच्या माध्यमातून त्यांनी सोलापूरचे
नाव साता समुद्रापार पोहोचले आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये दर्शनी भागात असलेला साडेपाच फूट उंच आणि आठ फूट लांबीचा मस्तवाल बैल रामपुरे यांच्या शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे.त्यांनी बनवलेल्या विघ्नहर्त्या गणेशाच्या मूर्ती अमेरिकेसह पॅरिसमध्ये पोहोचल्या आहेत.
दीनानाथ मंगेशकरां पासुन ते ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकरां पर्यंत आणि अभिनेता आमिरखान पासून ते ख्यातनाम कवी गुलजार पर्यंत अनेकांच्या शिल्पकृती रामपुरे यांनी साकारल्या आहेत. त्यांनी शिल्पकलेच्या माध्यमातून समाजाला दिलेल्या योगदानाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना ‘मसाप सन्मान’ देण्यात येत आहे,असेही कुलकर्णी यांनी सांगितले.