मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरातून नियमित गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतांना नुकतेच नवीन वर्षाच्या सुरुवातीस मीरा रोडच्या शांती शॉपिंग सेंटरमध्ये रात्री 10 वाजेच्या सुमारास एका व्यापाऱ्याची गोळी झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. मृत व्यक्तीचे नाव शम्स तमरेज अन्सारी उर्फ सोनू (35) असे असून, त्याचे चष्मा विक्रीचे दुकान या शॉपिंग सेंटरमध्ये होते. मोहम्मद अन्सारी एका गंभीर गुन्ह्यात साक्षीदार होता, यामुळे त्याला काही दिवसांपासून धमक्या मिळत होत्या. या धमक्यांबाबत अन्सारीने पोलिस ठाण्यात तक्रार देखील केली होती. मात्र, आज रात्री अज्ञात हल्लेखोराने शॉपिंग सेंटरमध्ये अन्सारीच्या डोक्यात गोळी झाडली.
मीरा रोड परिसरात असलेल्या शांती शॉपिंग सेंटरमध्ये या दुकानदाराचे चष्म्याचे दुकान होते. जुन्या वादातूनच ही गोळीबाराची घटना घडली असल्याचा पोलिसांनी म्हटले आहे. रात्री साडेनऊ वाजता दुकानात असलेल्या एका व्यक्तीसोबत सदरील व्यापाऱ्याचा वाद सुरू होता. त्याचवेळी अचानक आरोपीने थेट अन्सारी यांच्या डोक्यात गोळी घातली. या घटनेमध्ये अन्सारी यांचा जागीच मृत्यू झाला.
गोळीबाराच्या आवाजामुळे व्यापारी संकुलामध्ये एकच खळबळ उडाली होती. सदरील आरोपी हा गोळीबार करून घटनास्थळावरून फरार झाला. त्यानंतर नया नगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शुभविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिस हल्लेखोराचा शोध घेत आहेत. मयत अन्सारी याचा येथील एका व्यापारासोबत मागील काही दिवसांपासून वाद होता, अशी माहिती नया नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमर जगदाळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. या वादातूनच ही गोळीबाराची घटना घडली असावी अशी शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे.