सांगली : वृत्तसंस्था
प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून गुन्हेगारी घटना उघडकीस येत असतांना आता सांगली जिल्ह्यतील शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती येथे अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून मृतदेह स्मशानभूमीत पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. संजय अल्लाबक्ष शिकलगार (३८, मूळ रा. यादवनगर, जयसिंगपूर, सध्या रा. लक्ष्मीनगर धरणगुत्ती) असे मृताचे नाव आहे. संजय यांचा कोयत्याने सपासप डोक्यात व मानेवर वार करून खून केल्याची घटना गुरुवारी (२७ फेब्रुवारी) लिंगायत स्मशानभूमीजवळ रात्री घडली होती. त्यानंतर लगेच धरणगुत्ती येथील लिंगायत स्मशानभूमीत हा मृतदेह पुरण्यात आला होता.
शिरोळ पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन खुनाची माहिती घेतल्यानंतर घटनास्थळी नेऊन पुरण्यात आलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी पत्नी दीपा संजय शिकलगार (३५, रा. लक्ष्मीनगर धरणगुत्ती), प्रियकर दर्शन भगवान कांबळे (३६), प्रियकराचा भाऊ अमृत भगवान कांबळे व प्रियकराचा चुलता स्वागत विजय कांबळे (तिघे रा. धरणगुत्ती, ता. शिरोळ) यांच्याविरोधात शिरोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पाेलिस ठाण्याच्या हद्दीत डुडुळगाव येथे २८ फेब्रुवारी राेजी वन विभागाच्या डाेंगराजवळ निर्जनस्थळी आमुसाब साहेबलाल मुल्ला (३४) याचा धारदार शस्त्राच्या साहाय्याने पाेटावर ठिकठिकाणी वार करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात पुणे पोलिसांनी मृताच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला उत्तर प्रदेशातून अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.
अब्दुल मकबूल मलिक (४५, रा. डुडुळगाव, ता. हवेली, पुणे, मु. रा. साबरपूर, ता. मनकापूर, जि. गाेंडा, उत्तर प्रदेश) आणि जेबा अमुदसाब मुल्ला (३०) अशी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. याप्रकरणी दिघी पाेलिस ठाण्यात आराेपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा तपास करताना संबंधित आराेपीविरुध्द काेणताही पुरावा सापडत नव्हता. आराेपींविरुध्द पुरावा शाेधण्याचे काम आव्हानात्मक हाेते.
तांत्रिक विश्लेषणात्मक तपास करूनही उपयुक्त माहिती सापडत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक नागरिकांकडे चौकशी करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्या वेळी मृताच्या घराशेजारी राहणारा भंगार व्यावसायिक संशयित हा घटनेच्या दिवशी सकाळपासून त्याच्या उत्तर प्रदेशमधील गाेंडा या मूळ गावी गेल्याचे समजले. त्यानुसार पाेलिसांनी उत्तर प्रदेश येथून दोघांनाही अटक करून पुण्यात आणल्याचे सांगण्यात आले.
संजय शिकलगार गेल्या दीड वर्षापासून गोव्यात गवंडी म्हणून काम करत होता. २६ फेब्रुवारी रोजी संजय गोव्यावरून जयसिंगपूर येथे आला होता. गेल्या काही दिवसांपासून पत्नी दीपा व दर्शन यांच्यात अनैतिक संबंध होते. यावरून पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद सुरू होता. मात्र, पती संजय हा अनैतिक संबंधात अडसर येत असल्याने पत्नी व प्रियकराने संजय याचा काटा काढण्याचा डाव रचला होता. यातूनच सर्वांनी त्याचा खून केल्याचे उघडकीस आले.