अत्यवस्थ तरुण रुग्णाच्या मदतीला धावले बार्शीतील तृतीयपंथी !
' टाळी ' वाजवून मिळालेले पैसे दिले उपचारासाठी
बार्शी : प्रतिनिधी
येथील तरुण कलाकार हर्षद लोहार हा अत्यवस्थ असून खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्या उपचारासाठी आवाहन केल्यानंतर बार्शीकरांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. तृतीयपंथी मार्गदर्शक सचिन वायकुळे यांच्या पुढाकाराने येथील तृतीयपंथी देखील मदतीसाठी धावले. दिवसभर ‘ टाळी ‘ वाजवून जमा झालेली रक्कम त्यांनी लोहार यांच्या उपचारासाठी दिली.
तरुण कलाकार हर्षद लोहार यांना चक्कर येऊन पडल्याने मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. यानंतर डॉ. अमित पडवळ यांनी तत्काळ कोणतीही पैशाची मागणी न करता उपचार सुरू केले. आवश्यक ती अवघड अशी शस्त्रक्रियाही केली. यावेळी लोहार यांचा मित्र परिवार अजित कुंकुलोळ, रामचंद्र इकारे, उमेश काळे, प्रवीण परदेशी, प्रवीण पावले आदींनी आधी स्वतः मदत करून बार्शीकरांना मदतीचे आवाहन केले. यावेळी जात , धर्म, पंथ सारे बाजूला ठेवत माणुसकीच्या नात्याने बार्शीतील विविध घटकांनी मदतीसाठी हात उधे केला. तृतीयपंथी मार्गदर्शक वायकुळे यांच्या पुढाकाराने येथील तृतीयपंथी यांनी दिवसभर ‘ टाळी ‘ वाजवून मिळालेली सर्व रक्कम लोहार यांच्या उपचारासाठी देत सामाजिक बांधिलकी जपली.यावेळी तृतीयपंथी मार्गदर्शक सचिन वायकुळे, तृतीयपंथी चे प्रतिनिधित्व म्हणून किरण मस्तानी, लता रणदिवे, प्रीती देवकर हे उपस्थित होते.
प्रत्येकाच्या संकटात आम्ही माणुसकीच्या नात्याने उभा राहू : मस्तानी
शहरातील व्यापारी व विविध घटकांनी दिलेल्या जोगव्यामलमुळे आमचे पोट भरते. या समाजातील प्रत्येक घटकाच्या संकट काळात आम्ही पण माणुसकीच्या नात्याने पाठीशी उभा राहू. सुखात नसलो तरी दुःखात आम्ही कायम सर्वांच्या सोबत राहू. सर्वांनी पुढे होऊन आणखी मदत करावी.
– किरण मस्तानी, तृतीयपंथी गुरू
सामाजिक अंतर कमी करणारे पाऊल : वायकुळे
तृतीयपंथी समुदाय यांच्याबाबत नेहमी तिरस्कार केला जातो. मात्र तृतीयपंथी देखील समाजातील एक वंचित घटक असला तरी तेही माणसेच आहे. दुःख काळात ज्या समाजाने दिले त्या समाजाप्रती समर्पित भाव ठेवण्याची वृत्ती तृतीयपंथी यांच्यातदेखील आहे. त्यांच्याशी संवादी राहिल्यास मिळणारा प्रतिसाद देखील सकारात्मक असेल. असे प्रसंग तृतीयपंथी आणि समाज यांच्यातील अंतर कमी करणारे आहेत.
: सचिन वायकुळे तृतयपंथी मार्गदर्शक , बार्शी