मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश आल्यानंतर आता शिंदेंच्या आमदाराने मोठी घोषणा केल्याने चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. सिल्लोड येथील अंभई येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना अब्दुल सत्तार यांनी ही घोषणा केली आहे.
कार्यक्रमात बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, मी आमदार-मंत्री असताना 18-18 तास सालदार महिनदार सारखे काम केले. शासकीय योजनेचा लाभ अनेक महिलांना व कामगारांना मिळवून दिला, मतदारसंघाचा विकास केला, पण शेवटी जाती पातीवर निवडणूक झाली व माझा विजय 2420 मतांनी झाला. लोकांना विकास नकोय, जाती पातीवर निवडणुका होत असतील तर आगामी सिल्लोडची नगर परिषद माझी शेवटची निवडणूक राहील. मी यापुढे सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही, अशी थेट घोषणाच अब्दुल सत्तार यांनी केली आहे.
पुढे बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, मी मतदारसंघाचा विकास केला, पण शेवटी जाती पातीवर निवडणूक झाली, लोकांना विकास नकोय, तर जाती पातीवर निवडणुका हव्यात. आगामी सिल्लोडची नगर परिषद माझी शेवटची निवडणूक राहील, मी यापुढे सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही. कामगारांची नोंदणी करण्यासाठी यंत्रणा राबवली, सिल्लोड सोयगाव मतदार संघाचा विकास केला, सूतगिरणी, मेडिकल कॉलेज, एमआयडिसी आणली. शेतकरी बागायतदार व्हावा, यासाठी पूर्णा नदीवर बेरिजेस बांधण्याच्या कामाला मंजुरी घेतली.
आमदार व मंत्री असतांना कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. पण, विरोधक काहीच कामे न करता, त्यांना माझ्याबरोबरीने मतदान मिळते. विरोधक जाती पातीवर निवडणूक लढवतात, हे राजकारण घातक आहे. जर विकासाला प्राधान्य मिळत नसेल व केवळ जाती पातीवर निवडणुका होत असेल, तर लोकांनी मला आतापर्यंत निवडून दिले त्यांचे आभार, पण मी आता यापुढे सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही, अशी खंत अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली. तसेच मी माझा मुलगा, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर याला सांगितले की, मी निवडणूक लढणार नाही, तुला लढायची असेल, तर बघ नाहीतर जय हिंद जय महाराष्ट्र, असे अब्दुल सत्तार म्हणाले.