नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोलकत्ता येथील घटना ताजी असतांना नुकतेच आंध्र प्रदेश राज्यातील कृष्णा जिल्ह्यातील गुडीवाडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलींच्या स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा सापडला आहे. गुरुवारी सायंकाळी 7 वाजता ही बातमी समजताच महाविद्यालयात खळबळ उडाली. कॅमेऱ्यांद्वारे विद्यार्थिनींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जात होते. जे नंतर लीक करून काही विद्यार्थिनींना विकण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लीक झालेल्या फोटो आणि व्हिडिओंची संख्या 300 च्या आसपास आहे. याप्रकरणी पोलिसांनी विजय कुमार याला अटक केली आहे, जो गुडलावलेरू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गुडीवाडा येथील बी.टेकच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याचा फोन आणि लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे. गुडलावलेरू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला आठवडाभरापूर्वी याची माहिती देण्यात आली होती, परंतु कॉलेजने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. गुरुवारी विद्यार्थिनींनी निषेधार्थ घोषणाबाजी सुरू केली. कॉलेजला ही बाब लपवायची होती. ही बातमी प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचू नये म्हणून कॉलेजचे दरवाजेही बंद करण्यात आले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस आले, त्यांनी आरोपीची चौकशी करून त्याला अटक केली.
मुलींच्या टॉयलेटमध्ये कॅमेरा लपवण्यासाठी कॉलेज तरुणीने विजयला मदत केल्याचा दावाही काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. ही मुलगी कोण होती हे पोलीस किंवा कॉलेज प्रशासनाने उघड केलेले नाही. मात्र, विजयसोबत एका मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याबाबत असा दावा केला जात आहे की तिने कॅमेरा लपवला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.