---Advertisement---

धक्कादायक : आईसमोरच बाराव्या मजल्यावरुन पडून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

By team
On: July 26, 2025 6:38 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

वसई पूर्वेकडील नायगाव या ठिकाणी असणाऱ्या इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून खाली पडून एका ४ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मंगळवारी २२ जुलै रोजी रात्री ८ ते ८:३० च्या सुमारास ही घटना घडली. अन्विका प्रजापती (४) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. या घटनेने नायगाव परिसर हादरला आहे. यामुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रजापती कुटुंब नायगाव पूर्वेकडील ‘नवकार फेज वन’ या इमारतीत, बी-२ विंगमध्ये राहत होते. मंगळवारी रात्री अन्विका याच सोसायटीतील बी-३ विंगमध्ये असलेल्या आपल्या बहिणीच्या घरी गेली होती. यावेळी ही दुर्घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.

मंगळवारी रात्री अन्विका तिच्या आईसोबत सोसायटीतील बी-३ विंगमध्ये असलेल्या आपल्या बहिणीच्या घरी गेली होती. ते घरी जाण्यासाठी निघाले असताना अन्विका ही घराबाहेर खेळत होती. यामुळे तिच्या आईने तिला चप्पल ठेवण्याच्या लाकडी स्टँडवर बसवले होते. यानंतर खेळता खेळता अन्विका स्टँडवर चढून खिडकीजवळ गेली. दुर्दैवाने, तिचा अचानक तोल गेला आणि काही समजण्याच्या आतच ती १२ व्या मजल्यावरून खाली पडली. ही संपूर्ण दुर्दैवी घटना इमारतीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

घटनेनंतर तात्काळ इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी अन्विकाला उपचारासाठी वसईतील महापालिकेच्या सर डी. एम. पेटिट रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेमुळे नायगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच यामुळे प्रजापती कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे पालकांनी आपल्या मुलांना डोळ्यात तेल घालून जपावे, असे सांगितले जात आहे. दरम्यान नवकार इमारतीमधील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, या १४ मजली इमारतींमधील बहुतांश इमारतींच्या खिडक्यांना आणि गॅलरीला कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा जाळ्या नाहीत. तसेच अन्य ठिकाणीही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. जर सुरक्षा जाळ्या असत्या तर ही चिमुकली खाली पडली नसती, अशी प्रतिक्रिया इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी दिली आहे. सुरक्षा उपायांच्या अभावामुळे एका चिमुकल्या जीवाचा बळी गेल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!