जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा, विविध सामाजिक संघटना, तरुण मंडळे, शासकीय कार्यालय यांनी रक्तदान शिबीर आयोजित करावे ; विकृतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दंतकाळे यांचे आवाहन
सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय ( सिव्हिल हॉस्पिटल) सोलापूर येथे जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील व कर्नाटक राज्य सीमावर्ती भागातील अनेक गोरगरीब, गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यात येते. सध्या शासकीय रक्तपेढीमध्ये रक्त पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून, रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, तरुण मंडळे, शासकीय कार्यालय यांनी रक्तदान शिबिर आयोजित करावे, असे आवाहन विकृतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दंतकाळे यांनी केले आहे.
जिल्हा रुग्णालय, सोलापूर येथे एकमेव शासकीय रक्तपेढी असून, अनेक गोरगरीब, गरजू रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी, अपघातग्रस्त रुग्णांसाठी, प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांसाठी तसेच रक्तविकाराशी निगडित असलेल्या रुग्णांसाठी येथील शासकीय रक्तपेढीतून रक्तसाठा पुरवला जातो. मागील 15 दिवस सर्व शैक्षणिक संस्था दीपावली सुट्टीमुळे बंद असल्याने रक्तदानामध्ये अग्रेसर असलेला युवावर्ग ही उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे सध्या रक्तपेढीमध्ये रक्तपिशव्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, तरुण मंडळ, शासकीय कार्यालय यांनी रक्तदान शिबिरे आयोजित करावीत. तसेच जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तपेढीत येऊन रक्तदान करावे, असे आवाहनही डॉ. दंतकाळे यांनी केले आहे.
रक्तदान शिबिर आयोजनाकरिता गायकवाड (भ्रमणध्वनी क्रमांक ९८८१७८६१४३) साळुंखे (भ्रमणध्वनी क्रमांक ९४२०५४११९२) यांच्याशी संपर्क साधावा.