---Advertisement---

तर मग ठरलं : लाखो मराठ्यांना घेऊन जरांगे पाटील मुंबईत दाखल होणार !

By team
On: August 24, 2025 9:48 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

महाराष्ट्रातील मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, अशी मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील २७ ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच करून २८ ऑगस्ट रोजी मुंबई शहरात दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत आंतरवाली सराटी येथून लाखो बांधव असतील, असे सांगण्यात आले आहे. मुंबईत दाखल होण्याच्या पूर्वसंध्येला जरांगे शिवनेरी किल्ल्यावर जाऊन दर्शन घेणार आहेत. जुन्नर येथे त्यांचा पहिला मुक्काम असेल. आझाद मैदानावर ते २९ ऑगस्टपासून उपोषण सुरू करणार आहेत. मराठा आंदोलक मुंबईत यावेत आणि त्यांच्यात दंगल घडून यावी अशी सरकारचीच इच्छा आहे. सरकारच मराठ्यांच्या अंगावर आग फेकू पाहत आहे, असा आरोप जरांगेंनी केला. तर मुंबईतील आंदोलनापूर्वी जरांगेंनी सरकारशी चर्चा करावी, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तर ओबीसींचे ज्येष्ठ नेते, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, चार आयोगांनी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण नाकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाचाही या विषयी निकाल आहे. मग हे लोकांना का त्रास देत आहेत?

गेल्या दीड महिन्यात जरांगेंनी स्वतः अनेक जिल्ह्यांत जाऊन मुंबईतील आंदोलनाची तयारी करून घेतली. त्यामुळे प्रत्येक मोठ्या गावातून १० ते १५ वाहने मुंबईकडे निघतील. तालुक्याची गावे आणि मोठ्या शहरातून हा आकडा प्रचंड मोठा असेल, असा दावा केला जातो आहे. आंतरवालीतून जरांगेंसोबत विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशमधील बांधव निघतील. पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यातील बांधव रस्त्याने त्यांच्यासोबत सहभागी होतील. या दौऱ्यातील पहिला मुक्काम पुणे जिल्ह्यातील जुन्नर दुसरा मुक्काम थेट आझाद मैदानावर होणार आहे. मैदानावर पोहोचताच जरांगेंचे उपोषण सुरू होणार आहे.

वाळूचोरीचे गुन्हा दाखल असलेला जरांगे समर्थक सोळुंके एका वर्षासाठी स्थानबद्ध जरांगे समर्थक सुयोग ऊर्फ सुशील मधुकर सोळुंकेला (३६, रा. गोंदी, ता. अंबड) पोलिसांनी एक वर्षासाठी हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले आहे. वाळूचोरीचे गुन्हे दाखल असल्याने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. कारवाई करूनही गुन्हे करण्याचे थांबत नसल्याने प्रशासनाने त्यांच्याविरुद्ध शनिवारी ही कारवाई केली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये तीन जिल्ह्यांतून हद्दपारीची प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती.

असा आहे मार्ग : २७ ऑगस्ट

आंतरवाली सराटी, शहागड फाटा, साष्टपिंपळगाव, आपेगाव, पैठण फाटा कमान, घोटन, शेवगाव, पांढरीपूल, अहिल्यानगर, आळे फाटा, शिवनेरी दर्शन व जुन्नर मुक्काम २८ ऑगस्ट : राजगुरूनगर, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशीमार्गे चेंबूर. रात्री उशिरा आझाद मैदान येथे पोहोचणार.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!