---Advertisement---

…तर मंत्री भुजबळ राजीनामा देणार का ? ; संजय राऊत !

By team
On: September 4, 2025 4:19 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचे पाच दिवस मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. अखेर राज्य सरकारकडून जरांगे यांची आंदोलनस्थळी भेट घेत त्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला. त्यांच्या नाराजीच्या बातम्या देखील समोर येत आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जर भुजबळ यांना समाजावर अन्याय झाला असे वाटत असेल तर ते राजीनामा देणार का? असा सवाल केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, “अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने भुजबळांना मंत्रिमंडळात जागा दिली नव्हती. पण ओबीसींचे नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नाराजीवर लक्ष घातले आणि मुख्यमंत्र्यांना सांगून त्यांना मंत्रिमंडळात घेतले. अजित पवारांच्या कृपेमुळे भुजबळ मंत्रिमंडळात नाही, तर नरेंद्र मोदींची कृपा आहे. सगळ्यांचा विरोध डावलून भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्यात आले. आता भुजबळच नाराज आहेत, असं दिसतंय. त्यामुळे आता भुजबळ हे मोदींना जाऊन भेटतील आणि आवश्यक घटना दुरुस्ती करून आणतील,” असा चिमटा राऊतांनी काढला.

“मंडल विषयाच्या मुद्यावर तुम्ही शिवसेना सोडली होती. बाळासाहेब म्हणाले होते की शिवसेना जातीपातीचे राजकारण करणार नाही. शिवसेना सोडली होती, आता तुम्ही मंत्रिमंडळ सोडणार का? जर एखाद्या समाजावर अन्याय झाला आणि आपण त्या समाजाचे नेतृत्व करतो तर ते राजीनामा देणार आहेत का? त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे. तुमच्या समाजावर अन्याय झाला आहे आणि अन्याय करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करत आहात. मग भुजबळांनी राजीनामा दिला पाहिजे आणि या कारणासाठी मी राजीनामा देत आहे हे स्पष्ट केले पाहिजे. कॅबिनेटवर जर भुजबळ बहिष्कार टाकत असतील तर स्वाभिमान आणि नैतिकतेला धरून भुजबळांनी राजीनामा द्यायला हवा,” असा टोला राऊतांनी लगावला.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!