ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दीड हजारांची लाच घेताना वाहतूक पोलिस कर्मचारी जाळयात

सोलापूर वृत्तसंस्था 

सोलापूर वाहतूक विभागाच्या पोलिस कर्मचाऱ्याला दीड हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबीने) गुरुवारी रंगेहाथ पकडले. तीन हजार रुपये दंड थकीत आहेत. थकीत दंड माफ करतो असे सांगत पोलिस कर्मचाऱ्याने लाच मागितली.

बसप्पा शिवाजी साखरे (वय 34, सोलापूर शहर वाहतुक शाखा ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी २४ वर्षांच्या तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानुसार, जेलरोड पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलेटचा सायलेंसर हा कंपनीचा नाही व बुलेटवर यापुर्वीचे तीन हजार रुपये दंड थकीत असल्याचे साखरे याने सांगितले. तक्रारदार तरुणाने थेट ‘एसीबी’चे कार्यालय गाठले. त्याने वाहतूक पोलिस कर्मचारी दीड हजार रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली.

त्यानुसार जेलरोड पोलिस ठाण्यात सापळा रचण्यात आला. तक्रारदार तरुणाने साखरे याला दीड हजार रुपये दिले. साखरे याने ते ठेवून घेतले. त्यावेळी तरुणाने पावती मागितली; पण कशाला पावती म्हणून त्याला जाण्यास सांगितले. कोणतेही चलन न देता पैसे घेतल्याचे दिसून आल्यानंतर पंचांसमक्ष एसीबीच्या अधिकाऱ्यांनी साखरे यांना पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश पिंगूवाले, पोलिस अंमलादार शिरीषकुमार सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राठोड, पोलीस कॉन्स्टेबल शाम सुरवसे यांच्या पथकाने केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!