ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोनामुळे चार एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू तरीही महामंडळाला जाग येईना, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी कामगार दिनीच उपोषण !

 

अक्कलकोट,दि.२ : चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असताना देखील कोरोना काळात परिवहन कर्मचाऱ्यांना मृत्यूच्या दाढेत देऊ नका या मागणीसाठी १ मे कामगार दिनीच अक्कलकोटमध्ये उपोषण करण्यात आले.कोरोना काळात अक्कलकोट विभागातील परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांना मुंबई येथे बेस्ट सेवेसाठी पाठविण्याचा निर्णय झाला आहे त्या पार्श्वभूमीवर अशा कर्मचाऱ्यांना मुंबई येथे पाठवून मृत्यूच्या दाढेत देऊ नका या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे आणि संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश सूर्यवंशी यांनी उपोषण केले.
यापूर्वी अक्कलकोट आगारातील चालक-वाहकांना मुंबई येथे सेवेसाठी पाठवण्यात आले होते यावेळी चालक चंद्रकांत रेड्डी (सांगवी)आणि रविकांत घोडके (अक्कलकोट) या दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तसेच  अक्कलकोट तालुक्यातील कर्जाळ आणि सोलापूर डेपोत कार्यरत असणारे राजेश इंगळे या वाहकाचा देखील कोरोना  मृत्यू झाला त्याच वेळी अक्कलकोट आगारातील बिलाल सय्यद याचा देखील मृत्यू झाला. मुंबई येथे सेवेला न गेल्यास सदर कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्याची धमकी दिली जाते हे योग्य नव्हे अशाप्रकारे अक्कलकोट आगारातील कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
या लाक्षणिक उपोषणाला जिल्हा आरपीआय उपाध्यक्ष माजी नगरसेवक उत्तम गायकवाड यांनी भेट दिली आणि यासंदर्भात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधा आणि अक्कलकोट सारख्या दूरच्या विभागातील लोकांना मुंबईमध्ये पाठवू नये यासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली दिलीप सिध्दे यांनी देखील कर्मचाऱ्यांची वस्तुस्थिती आठवले यांच्या कानावर घातली. तालुका आरपीआय अध्यक्ष अविनाश मडिखांबे  यांनीदेखील कर्मचाऱ्यांना मृत्यूच्या दारात ढकलू नका अशी मागणी केली.यावेळी आगार प्रमुख रमेश म्हंता आणि स्थानक प्रमुख जयसिंग चव्हाण यांच्याशी चर्चा केली. यावेळी मैनोद्दीन कोरबु ,अली बाशा आतार यांनीही कर्मचाऱ्यांची बाजू घेतली.

 

कर्मचाऱ्यांच्या
मृत्यूला जबाबदार कोण ?

मुंबई येथील बेस्ट आणि परिवहन महामंडळ यांच्यात करार आहे त्यानुसार कर्मचारी पाठवले जातात मात्र अशा कर्मचाऱ्यांची जाताना आणि सेवा बजावू येताना कोणत्याही प्रकारची कोरोना चाचणी केली जात नाही याशिवाय विमा कवच नाही आणि वैद्यकीय बिले देखील मिळत नाहीत तसेच पाचशे किलोमीटर वरून मुंबई येथे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची मानसिक आणि शारीरिक स्थिती पाहता दुर्दैवाने काय घडल्यास मुंबईसारख्या ठिकाणी त्यांची अवस्था बिकट होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!