ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घ्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ६:- ‘ मृद व जलसंधारण विभागाने पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घेऊन स्थानिक सिंचन क्षमता वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी विभागाचे बळकटीकरण आणि आर्थिक तरतूद यासाठी सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

जलयुक्त शिवार अभियानाला पुन्हा गतीमान करण्याचे नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. नाले- ओढ्यातील गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य देण्याची सूचनाही त्यांनी केली. मृद व जलसंधारण विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, या बैठकीत ते बोलत होते. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथील बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जलसंधारण महामंडळाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मृद व जलसंधारण विभाग शेतकऱ्यांशी निगडित असा आहे. पाण्याची उपलब्धता, नियोजन आणि सिंचन सुविधा हा मोठा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घेण्यात यावीत. यातून स्थानिक रित्या खात्रीशीर अशी आणि मोठ्या क्षेत्रासाठी सिंचन क्षमता निर्माण होते. जलयुक्त शिवार अभियानातूनही मोठा फायदा झाल्याचे आढळून आले आहे. या अभियानाला गती देण्याचे नियोजन करता येईल. विभागाने उपलब्ध आर्थिक तरतूद वेळेत आणि दर्जेदार कामांसाठी खर्च होईल यासाठी नियोजन करावे, त्यासाठी आपल्या क्षेत्रीय यंत्रणा, अभियंते आदींशी समन्वय साधण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी विभागाकडून सादर करण्यात प्रस्तावांना जलदगतीने प्रशासकीय मान्यता प्रदान व्हाव्यात, विभागाच्या बळकटीकरणासाठी रिक्त पदांची भरती प्रक्रिया गतीमान करणे आदी बाबींवरही चर्चा झाली. जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत सुमारे १ लाख ३ हजार ८३४ संरचनाच्या योजनांमुळे अप्रत्यक्षरीत्या सुमारे १७ लाख २४ हजार ९३३ हेक्टर सिंचन क्षमता स्थापित झाल्याची माहितीही बैठकीत सादरीकरणाद्वारे देण्यात आली. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या योजना आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना यांच्याविषयी माहिती देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!