ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मराठवाड्यासह अनेक भागात तापमानात होणार वाढ !

मुंबई : वृत्तसंस्था

देशात गेल्या काही दिवसापासून थंडीचा जोर वाढला होता आता महाराष्ट्रातील काही भागात थंडीसह उन्हाचा देखील दुपारी चटका बसू लागत आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानात पुढील दोन दिवस फारसा बदल होणार नसला तरी या आठवड्यात तापमानातील बदल जाणवणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र, मध्य आणि पूर्व विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात कमल तापमानाचा पारा हा 33 ते 34 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर राज्यातील आकाश निरभ्र राहणार असून येत्या दोन ते तीन दिवसात किमान तापमानात दोन ते तीन अंशाची वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

सध्या सूर्याचे उत्तरायण सुरू असून दिवस मोठा आणि रात्र छोटी होत जाणार आहे. त्यातच राज्यात दोन दिवसांपासून किमान तापमान काही अंशांनी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात कोरड्या व शुष्क वाऱ्यांचा प्रभाव देखील दिसून येतोय. त्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या वेळी प्रचंड गारवा वाढला आहे. त्यात थंडीचा जोर देखील वाढला आहे. तर दुपारी मात्र उन्हाचा चटका बसत आहे. पुण्यात देखील गेल्या काही दिवसांपासून 17 ते 18 अंश असणारे तापमान आता 15 ते 16 अंशापर्यंत खाली आले आहे. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा हा 13 ते 20 अंशापर्यंत खाली आल्याची नोंद करण्यात आली आहे. तर कमान तापमान देखील वाढले असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाचा चटका बसत आहे. राज्यात तापमानाचा पारा 29 अंशापासून 38 अंशापर्यंत पोहोचला आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात येत्या चार ते पाच दिवसात कमाल तापमान दोन ते तीन अंशाने वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या दोन दिवसात किमान तापमानात फारसे बदल होणार नाही. मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात बदल होतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विदर्भात देखील येत्या तीन ते चार दिवसात कमल आणि किमान तापमान यामधील दोन ते तीन अंशांची घट होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!