ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धाराशिवमध्ये भीषण अपघात : भरधाव जीप ट्रॅक्टरला धडकली : पाच भाविकांचा दुर्देवी मृत्यू !

धाराशिव : वृत्तसंस्था

राज्यातील महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असताना आता धाराशिवमध्ये शनिवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात नळदुर्ग येथे देवदर्शनाला जाणाऱ्या 5 भाविकांचा बळी गेला. टायर फुटल्यामुळे भरधाव वेगातील जीप एका ट्रॅक्टरला धडकल्यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेत इतर 8 जण गंभीर जखमी झालेत. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील सोलापूर – हैदराबाद महामार्गावरून शनिवारी सकाळी एक क्रूझर जीप भरधाव वेगात जात होती. या गाडीतील प्रवाशी सोलापूरहून नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी जात होते. ही क्रूझर धाराशिवच्या अणदूर परिसरात आली असताना अचानक तिचे टायर फुटले. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून क्रूझर रस्त्यात उभ्या असणाऱ्या एका ट्रॅक्टरला धडकली. त्यानंतर ती रस्त्यावरच उलटली. या घटनेत 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांत 3 महिलांचा समावेश आहे. क्रूझरमधील इतर 8 जणही या अपघातात गंभीर जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी सोलापूर स्थित शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

क्रूझरने ट्रॅक्टरला धडक दिल्यानंतर जोराचा आवाज झाला. हा आवाज ऐकूण परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी क्रूझर सरळ करून त्यातून मृतदेह व जखमींना बाहेर काढले. सर्व मृत व जखमी दक्षिण उळे, सोलापूर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. हे सर्वजण क्रूझरमध्ये दाटीवाटीने बसून नळदुर्गला देवदर्शनासाठी जात होते. पण रस्त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला. ही धडक एवढी भीषण होती की, क्रूझरचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!