नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रशियातील दागेस्तानमध्ये रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाद्री आणि पोलिसांसह एकूण १५ जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी दोन रशियन चर्च, एक सिनेगॉग आणि पोलिस चौकीवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये एका पुजा-याचा ही मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेक पोलीस कर्मचारी आणि नागरिक मारले गेल्याचे वृत्त आहे. दहशतवादी हल्ल्यादरम्यान चर्चमध्ये आग लागल्याचीही पुष्टी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रशियाच्या दक्षिणेकडील प्रांत दागेस्तानमधील दहशतवाद्यांनी डर्बेंट शहरातील अनेक ठिकाणी अत्याधुनिक शस्त्रांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात चर्चचे पुजारी आणि पोलिसांसह एकूण १५ जण ठार झाल्याचे दागेस्तानच्या गव्हर्नरने सांगितले. दरम्यान, सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरात सहा दहशतवादी ठार झाले आहेत.या हल्ल्यात २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्लयाच्या निषेधार्थ तीन दिवस शोक दिन पाळण्यात येणार आहे.
दागेस्तानच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, शस्त्रांनी सज्ज असलेल्या इहशतवादी गटाने कॅस्पियन समुद्रावर असलेल्या डर्बेंट शहरातील सिनेगॉग आणि चर्चवर गोळीबार केला. या गोळीबारात दोन्ही ठिकाणी आग लागली. त्याच सुमारास मखचकला येथील चर्च आणि वाहतूक पोलिस चौकीवरही हल्ला झाला. या हल्ल्यांनंतर दहशतवादविरोधी पथकाने कारवाई सुरू केली आणि ६ दहशतवाद्यांना ठार केले. अद्याप कोणत्याही संघटनेने किंवा गटाने या हल्ल्यांची जबाबदारी घेतलेली नाही.