मुंबई वृत्तसंस्था : “कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, या भावनेतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात आज ऐतिहासिक युतीची अधिकृत घोषणा झाली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
युतीची घोषणा करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाम शब्दांत सांगितले की, *“मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच असणार.”* या घोषणेसह त्यांनी महापालिका निवडणुकीच्या रणशिंगाचा निनाद केला. मुंबईसह संपूर्ण राज्यात ठाकरे बंधू एकत्र येण्याची दीर्घकाळापासून असलेली जनभावना आज राजकीयदृष्ट्या साकार झाली आहे.
राज ठाकरे म्हणाले की, *“कोण किती जागा लढवणार, आकडे काय असतील हे आत्ता सांगणार नाही. मात्र जे उमेदवार निवडणूक लढवतील, त्यांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल.”* राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका करत त्यांनी “निवडणूक उमेदवार पळवणाऱ्या टोळ्या” असा टोला लगावला.
भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या *“उद्धव ठाकरेंची ही शेवटची निवडणूक असेल”* या विधानावर राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. *“उत्तरे देवांना द्यायची असतात, दानवांना नाही,”* असे म्हणत त्यांनी दानवेंवर निशाणा साधला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.
दरम्यान, भाजपकडून मनसे–शिवसेना युतीवर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला. *“माझ्याकडे मुख्यमंत्र्यांचे अनेक व्हिडिओ आहेत. वेळ आली तर ‘लाव रे तो व्हिडिओ’ 2.0 पाहायला मिळेल,”* असा इशाराही त्यांनी दिला.
या युतीमुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार होणार असून, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.






