मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या आठवड्यात बदलापूर येथील एका शाळेत 2 चिमुकलींचे लैंगिक शोषण झाल्याची संतापजनक घटना घडली होती. त्यानंतर राज्यात सर्वत्र तीव्र पडसाद उमटले होते. पोलिसांनी या प्रकरणी शाळेतील अक्षय शिंदे नामक स्वच्छता कर्मचाऱ्याला अटक केली होती. त्याला कोर्टाने 24 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्याला सोमवारी पुन्हा कल्याण येथील न्यायमूर्ती व्ही ए पत्रावळे यांच्या न्यायदालनात उभे करण्यात आले. तिथे पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी केली. पण कोर्टाने पोलिसांची मागणी फेटाळत आरोपीला 14 दिवसांची म्हणजे 9 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
राज्यातील बदलापूर शहरात २ अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला कोर्टाने सोमवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आरोपी आता 9 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहे. कोर्टातून आरोपीला बाहेरपर्यंत नेताना पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. वकील पीयूष जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आणखी 3 लोकांना अटक करून त्यांची चौकशी करणार आहेत. मात्र वकील पीयूष जाधव यांनी त्यांचे नावे सांगितली नाहीत.
पोलिसांनी या प्रकरणी घटना घडली त्या शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका व सचिव यांनाही आरोपी केले आहे. या तिघांनाही सध्या फरार घोषित करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात पॉक्सो कायद्यातील तरुतुदीही लावल्या आहेत. दुसरीकडे, या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. विरोधी पक्षांनी सरकारच्या विरोधात तसेच पोलिसांच्या ढिसाळ कामगिरीच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलने केली.
संतप्त पालकांनी व बदलापूर येथील नागरिकांनी शाळेवर मोर्चा काढला तसेच रेल्वे रोको आंदोलनही करण्यात आले होते. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश सरकारने दिले. मात्र आंदोलन सुरू होण्याआधी पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यासाठी देखील पालकांना ताटकळत ठेवले होते. तसेच शाळा व्यवस्था देखील हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याचाच परिणाम म्हणजे बदलापूरमध्ये तीव्र आंदोलन सुरू करण्यात आले होते. आरोपी अक्षय शिंदे हा पंधरा दिवसांपूर्वीच शाळेत सफाई कामगार म्हणून रुजू झाला होता. त्याच्याकडे मुलांचे व मुलींचे शौचालय साफ करण्याचे काम होते. मात्र तो लहान मुलींना त्रास देत असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समजताच पालकांनी थेट शाळेवर मोर्चा काढला.