अकोला : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण राज्य हादरले असून या आरोपींनी अत्यंत क्रूर व अमानुषपणे संतोष देशमुख यांची हत्या केली होती. संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओ देखील या नराधमांनी बनवले होते. या संपूर्ण घटनेवर संपूर्ण राज्यातून संतापाची लाट निर्माण झाली आहे. यावर प्रहार संघटनेचे नेते व माजी आमदार बच्चू कडू यांनी संतप्त प्रतिक्रिया देत थेट औरंगजेबाशी तुलना केली आहे.
बच्चू कडू म्हणाले, मला असे वाटते की एकंदरीत एवढी निर्घृण हत्या झाली आणि एवढे सगळे होऊन राजकारणी लोकांनी त्यावर राजकारण केले आहे. खरे तर हा दोन जातीतला वाद नसून ही प्रवृत्ती आहे. ज्या प्रमाणे संतोष देशमुखची हत्या झाली ती कशा प्रकारे झाली? ते कुठल्या प्रवृत्तीचे लोक होते? त्यांची जात कोणती होती? हा विषय महत्त्वाचा नाही. त्यांची जी प्रवृत्ती होती ती फार मला असे वाटते एखाद्या दुश्मनाच्याही म्हणजे औरंगजेबानेही केले नसेल असे कृत्य करून ठेवले आहे.
पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, अशा प्रवृत्तीला ठेचण्यासाठी तुम्हाला इतकी वर्ष लागतात. ती प्रवृत्ती वाढली कशी? कोणी खतपाणी घातले? ही जबाबदारी तिथल्या पोलिस प्रशासनाची नाही का? हे सगळे कसे आहे डोंगर मोठा झाल्यानंतर आता तुम्ही उंदराची चाल चलत आहात. वास्तविक याच्यामध्ये हे सगळे हत्या झाली म्हणून उघडकीस आले. मग एकंदरीत चालू काय होते बीडमध्ये? कोणाच्या आशिर्वादाने चालू होते? राजकारण म्हणजे सगळेच काही असे समजणारे जे लोक आहेत आणि राजकारणासाठी काही पण, कुठे पण आणि कसे पण करण्याची जी प्रवृत्ती आहे या देशामधील लोकांमध्ये वाढली आहे त्याचे हे मोठे उदाहरण आहे.