बीड : वृत्तसंस्था
राज्यातील भाजप आ.धस व मंत्री मुंडे यांच्या भेटीवरून राज्यात राजकारण तापले असतांना आता यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठा दावा केला आहे.
खा.सोनवणे म्हणाले कि, भाजप आमदार सुरेश धस व मंत्री धनंजय मुंडे यांची एकदा नव्हे तर दोनदा भेट झाली होती. या भेटीत त्यांच्यात काय शिजले हे माहिती नाही. पण थोडे दिवस थांबा, त्यांचे सर्वच गुपित बाहेर येईल, असा दावा त्यांनी केल आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे अडचणीत सापडलेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी यासंबंधी त्यांच्यावर ‘आकाचे आका’ म्हणत टीकेची झोड उठवली होती. तसेच त्यांचा राजीनामाही मागितला होता. पण आता त्यांनीच धनंजय मुंडे यांची भेट घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर टीकेची झोड उठली असताना शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दाखला देत धस व मुंडे यांच्या एक नव्हे तर दोन भेटी झाल्याचा दावा केला आहे.
बजरंग सोनवणे म्हणाले, संतोष देशमुख प्रकरण आता आमच्यासाठी जिव्हाळ्याचा मुद्दा बनले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरुवातीला 15 ते 20 दिवसांपूर्वी बैठक झाल्याचे सांगितले. त्यानंतर आता ते 27-28 दिवसांपूर्वी बैठक झाल्याचा दावा करत आहेत. पण माझ्या मते ही बैठक 18-19 दिवसांपूर्वी झाली असावी. मी त्या बैठकीची संपूर्ण माहिती देतो. थोडे दिवस थांबा. त्या बैठकीचे संपूर्ण गुपित उजेडात येईल.
बजरंग सोनवणे पुढे म्हणाले, माध्यमांनी सुरेश धस यांना तुमची व बावनकुळेंची भेट झाली का? असा प्रश्न केला होता. त्यावर सुरेश धसांनी दोन भेटी झाल्याचे सांगितले. म्हणजे याचा अर्थ असा होतो की, सुरेश धस व धनंजय मुंडे यांची पहिली भेट जेवणासाठी झाली असेल आणि दुसऱ्यांदा ते धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी भेटले असतील. या बैठकांकडे कुणीही दोन अँगलने पाहू शकले. पण या दोन्ही नेत्यांत बंद दाराआड नेमकी कोणती चर्चा झाली? हे मी तुम्हाला सांगेन. पण यासाठी काही दिवस वाट पहावी लागेल. बीडमधील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. देशमुखांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. कारण, त्यांना बीड जिल्ह्यात दहशत निर्माण करायची होती. संतोष देशमुखांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. आम्ही त्यांच्या कुटुंबासाठी न्याय मागत आहोत.