सोलापूर : प्रतिनिधी
आपल्या मुलीला भेटून गावी परतणाऱ्या आईचे एसटी बस मध्ये चढत असताना एका महिलेने मंगळसूत्र गळ्यातून जबरदस्तीने काढून घेऊन दुसऱ्या मुलाच्या हातात देत चोरी केल्याचा प्रकार वैराग बस स्थानकामध्ये घडला आहे. हा प्रकार बुधवारी दुपारी घडला असून संशयितरित्या चोरी करणाऱ्या महिलेला रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सदरची महिला सापडली असली तरी अद्याप चोरीस गेलेला ऐवज हस्तगत करण्यात आलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे राहणाऱ्या हजरतबी बाबूलाल शेख ह्या वैराग येथे विवाहित मुलीला भेटण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान, बुधवारी दुपारी एकच्या सुमारास आपल्या गावी नान्नजकडे परतण्यासाठी वैराग बस स्थानकामध्ये नातू अमर आणि नात रेहाना आजीला बस मध्ये बसून देण्यासाठी आले होते बुधवार हा बाजार दिवस असल्यामुळे बस स्थानकात मोठी गर्दी होती. यावेळी सोलापूरकडे जाणाऱ्या एसटीमध्ये चढत असताना हजरतबी यांना पाठीमागून एका इसमाने मानेला धरून बाजूला ढकलले, त्यावेळेस त्यांच्या पाठीमागे उभा असलेल्या एका महिलेने त्यांच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र काढून लगेच त्यांच्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या मुलाकडे दिले आणि त्या मुलाने तेथून पळ काढला. यावेळी हजरतबी यांनी आरडा ओरड केली मात्र तोपर्यंत चोराने पोबारा केला होता. तात्काळ नातू अमर आणि नात रेहाना यांच्या सहकार्याने संशयित महिलेस ताब्यात घेऊन त्यांनी वैराग पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी सदर महिलेची चौकशी केली असता या महिलेचे नाव आणि पत्ता समोर आले असून पोलीस चोरीस गेलेला माल हस्तगत करण्याच्या तयारीस लागले आहेत. सुमारे तीस हजार रुपये किमतीचे एक तोळे वजनाचे मशीनकट मनीमंगळसूत्र चोरीस गेल्याची फिर्याद नोंदवण्यात आली आहे.