मुंबई : वृत्तसंस्था
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया देणे सुरु केले असताना आता राज्यातील भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. महाविकास आघाडी ही महाभकास आघाडी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. स्वयंघोषित संपादक तथा विश्ववक्ता रडत राऊत हे तर कोमातच गेले असतील, अशी बोचरी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. आतापर्यंतच्या आलेल्या कलानुसार भाजपला 48 जागांवर स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. तर आम आदमी पार्टीला केवळ 22 जागा मिळाल्या. दिल्लीतील विजयानंतर महाराष्ट्र भाजपकडून जल्लोष साजरा केला जात आहे. तर अनेक नेते विरोधकांवर निशाणा साधत आहेत. चित्रा वाघ यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत संजय राऊत यांचा समाचार घेतला.
आज महाविकास आघाडी पुन्हा एकदा महाभकास आघाडी आहे हे सिद्ध झाले आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या. स्वयंघोषित संपादक तथा विश्ववक्ता रडत राऊत हे तर कोमातच गेले असतील..त्यांनी नेहमीप्रमाणे खोटी भविष्य वाणी केली होती… खरंतर त्याला स्वप्न रंजन म्हटले तर योग्य ठरेल, अशी टीका संजय राऊत यांच्यावर केली. दिल्लीची निवडणूक जिंकणे ही मोदीजींची शेवटची इच्छा आहे, असे हे वाचाळवीर गांजा फुंकून बरळले होते. आजचा निकाल पाहून दिल्लीतील आकाच्या गळ्यात गळे घालून ‘रडत राऊत’ धाय मोकलून रडतील हे नक्की, असा टोला चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना लगावला.