व्यसनमुक्त समाजाची निर्मिती व्हावी हाच प्रबोधनाचा हेतू – विठ्ठल माने
करजगी येथी निवासी श्रमसंस्कार शिबिरात कीर्तनातून प्रबोधन कार्यक्रम
अक्कलकोट : प्रतिनिधी
युवकांनी व्यसनमुक्त व्हावे तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी बालविवाह पासून दूर राहावे यासाठी कीर्तनातून प्रबोधन करत आहे असे भावनात्मक उद्गार कीर्तनकार विठ्ठल माने यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालय अक्कलकोट येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित करजगी येथील विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिरात स्वयंसेवक व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, अंधश्रद्धा तसेच दांभिकता यापासून समाजाने दूर राहावे, यासाठी कीर्तनातून आम्ही प्रबोधन करतो. युवक-युवती आमच्या कार्यक्रमास प्रतिसाद देतात म्हणूनच समाज परिवर्तन घडत आहे. हीच आमची फलश्रुती आहे. यावेळी मल्लिनाथ कल्याणशेट्टी म्हणाले की, राज्यातील संतांनी विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारून अंधश्रद्धा रूढी परंपरा यावर प्रहार केला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत बसवेश्वर यांनी समाजातील दांभिकता नष्ट करण्यासाठी अभंग, वचने, भारुड यांची रचना केली आहे. तसेच संत बसवेश्वरांनी कृतीयुक्त कार्यक्रमातून समाज प्रबोधन केले आहे. संतांचा आदर्श समाजाने घेतला पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले सूत्रसंचलन प्राध्यापिका शितल झिंगाडे- भस्मे यांनी केले, आभार कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक राजशेखर पवार यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन स्वयंसेवक समर्थ पवार पायल कांबळे यांनी केले.
कीर्तनातून झाले ग्रामस्थांचे प्रबोधन
व्यसनमुक्ती, पर्यावरण वृक्षारोपण, बचत गट, आरोग्य, बालविवाह प्रतिबंध आदी विषयावर विठ्ठल माने यांनी प्रबोधन केले. त्यास करजगी ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला.