ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रेकॉर्ड मोडणाऱ्या गोविंदा पथकाला मिळणार २५ लाखांचे बक्षीस

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यासह मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मंगळवारी १३५४ हून अधिक दहीहंडी उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे वर्तकनगर येथील ठाणे महापालिकेच्या शाळेच्या मैदानावर आयोजित दहीहंडी उत्सवात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या गोविंदा पथकासाठी २५ लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून लाखो रुपयांची बक्षिसे असलेल्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दहीहंडी टेंभी नाका (ठाणे) येथे दिवंगत आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे आयोजक स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. येथे पुरुषांसाठी एक लाख ५१ हजार पारितोषिक, महिला गोविंदांसाठी एक लाखाचे बक्षीस, ७ थर लावणाऱ्यांना १२ हजार, ६ थरांसाठी ६ हजार, ५ थरांसाठी ६ हजार, ४ थर लावणाऱ्यांसाठी पाच हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात १ हजार ३५४ दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये २६१ सार्वजनिक आणि १०९८ खासगी ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली विष्णुनगर येथील भगवती मैदानावर, माजी आमदार रवींद्र फाटक यांनी ठाण्यात, बाळकुम जकात नाक्याजवळ ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते देवराम भोईर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी देवीपारा मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. येथे हिंदीच नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार यात सहभागी होतात. यंदा ९ थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना १ लाख रुपये, ८ थर लावणाऱ्यांना २५ हजार रुपये, ७ थर लावणाऱ्या ८ हजार रुपये आणि ६ थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना ७ हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत. बोरिवली (पू.) येथील कोरा सेंटर मैदानावर भाजप आमदार सुनील राणे आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी दहिसर (पूर्व), अशोकवन येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. कांदिवली (पश्चिम) येथील पोयसर जिमखाना मैदानावर माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!