मुंबई : वृत्तसंस्था
अनेक दिवसांपासून रखडलेले वेतन आणि राज्य सरकारकडून सुरू असलेला चालढकलपणाच्या धोरणामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या एसटी कामगार संयुक्त कृती समितीने आज मंगळवार (दि.3) रोजीपासून नाशिक येथील एसटी आगार आणि स्थानकांमध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे संयुक्त कृती समिती संघटनांचे वर्चस्व असलेल्या काही एसटी स्थानक-आगारातील एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आल्या आहेत. एसटी कामगार संयुक्त कृती समितीने आज मंगळवार (दि.3) रोजी पासून राज्यातील सर्व आगार आणि स्थानकांमध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना वेतन आणि महागाई भत्ता, घरभाडे भत्ता मिळावा, एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये वेतनवाढ मिळावी या आणि अन्य आर्थिक मागण्या एसटी कामगार कृती समितीने केल्या आहेत. मागण्यांची पुर्तता करण्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही एस.टी. प्रशासनाकडून कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे क्रांतीदिनापासून आंदोलन पुकारण्यात आलेले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई याठिकाणी एसटी कामगार संयुक्त कृती समितीची बैठक ७ ऑगस्ट रोजी झाली होती तर २० ऑगस्टला अंतिम बैठक होऊन त्यावर तोडगा काढण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र अद्यापही कोणतीही उपाययोजना केली नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत आज मंगळवार, दि. ३ सप्टेंबरपासून तीव्र आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात स्वप्नील गडकरी, संदीप कुयटे, देवा सांगळे, नितीन जगताप, श्याम इंगळे, शशिकांत ढेपले, रमेश दोभाडे, योगेश लिंगायत, यशवंत राऊत, राकेश भंडोरी यांसह आदी सहभागी झाले आहेत. आंदोलनामुळे येत्या गणेशोत्सवात गावी येणाऱ्या गणेशभक्तांची मात्र गैरसोय होणार आहे.
संप मिटण्याची चिन्हे नसल्याने आणि कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने ठक्कर बाजार, सीबीएस येथील एसटी बसेसचा अचानक बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऐन वेळी एसटी बसेसने बंद पुकारल्याने प्रवाशांचे व शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे तर चाकरमान्यांना रिक्षा किंवा खासगी वाहनाने जाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याची चिन्हे आहेत.