---Advertisement---

… हा बिनडोक माणूस आहे ; शरद पवारांच्या नेत्यावर आ.गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल !

By team
On: September 19, 2025 9:34 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील भाजप व शरद पवार गटातील नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर हल्लाबोल चढविला आहे. जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे. दर आठ दिवसाला हा माणूस आपण किती बिनडोक आहे, हे सिद्ध करतोय. त्याचे काम फक्त गोपीचंद पडळकरला बदनाम करणे एवढेच. तो एका कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात मला गोवण्याचा प्रयत्न करत आहे. माझी जाणीवपूर्वक बदनामी करत आहे, असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. येथे भाजपच्यावतीने आयोजित निषेध मोर्चावेळी ते बोलत होते. तसेच त्यांनी यावेळी आमदार जयंत पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह टीका केली.

ते म्हणाले, जतमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम घेतल्यानंतर जयंत पाटलांनी आपण कोणत्या व्यापार्‍याकडून खंडणी घेतोय का, ही माहिती घेण्यासाठी जतमध्ये माणसे पाठवली. कार्यक्रम घेण्याची धमक आपल्यामध्ये आहे. पण मी काय आता आलोय का? असे अनेक अंगावर घेऊन आलोय. या प्रस्थापितांच्या सत्ताकारणामध्ये दोन-दोन महिने मी जेलमध्ये जाऊन आलोय.

पडळकर म्हणाले, जयंत पाटलांना एका माजी आमदाराचा फोन गेला. अभियंता वडार यांची आत्महत्या झाली आहे, आपण काय करायचे, असा प्रश्न त्याने जयंत पाटील यांना केला. यावेळी जयंत पाटील म्हणतो की, ‘तो माझ्या ईश्वरपूरचा आहे. मी तिथून फिल्डिंग लावतो.’ मात्र त्यांना कळायला पाहिजे, एका आमदाराचे ज्युनिअर इंजिनिअरकडे काय काम असते. आमदार आपल्या फंडातील कामाबाबत जिल्हा नियोजनकडे पत्र देतात. जिल्हा नियोजनच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभाग व पंचायत समितीकडे हे पत्र जाते. त्यानंतर ज्युनिअर इंजिनिअर अंदाजपत्रक तयार करत असतात, हे जयंत पाटील यांना कळायला हवे. फंडाबाबत आमदार पत्र देऊ शकतो. त्याव्यतिरिक्त आमदाराचा आणि कंत्राटदाराचा काही संबंध येत नाही.

पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन आक्षेपार्ह टीका केली. त्यांच्या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात मोठे वादंग निर्माण झाले. तसेच समाजमाध्यमातही या विषयावर चर्वितचर्वण सुरू झाले. टीकेने मर्यादा ओलांडल्याच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!