---Advertisement---

…ही तर राजकीय दबावाखाली झालेली हत्या ; कॉंग्रेसचा गंभीर आरोप !

By team
On: October 30, 2025 3:13 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या संशयास्पद आत्महत्येने राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण केले आहे. पोलिस तपास सुरू असतानाच या प्रकरणात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात तीव्र आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या हत्येच्या आरोपानंतर आता काँग्रेस नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणात धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी थेट आरोप केला आहे की, डॉक्टर तरुणीवर बलात्कार झाला असून हे आत्महत्येचे नव्हे तर संस्थात्मक हत्येचे प्रकरण आहे. वर्षा गायकवाड यांनी पीएसआय बदने आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे स्पष्टपणे घेत गंभीर गुन्ह्यांचे आरोप केले आहेत.

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, या तरुणीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आलं, तिच्यावर अत्याचार झाले आणि नंतर दबावाखाली तिच्या मृत्यूला आत्महत्येचं स्वरूप देण्यात आलं. त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, ज्यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केलं, त्याच अधिकाऱ्यांकडे चौकशीची जबाबदारी का दिली गेली? हे संपूर्ण यंत्रणा आरोपींना वाचवण्यासाठी काम करत असल्याचं स्पष्ट होतं. फलटणसारख्या छोट्या शहरात पोलिस, राजकारणी आणि प्रशासन यांच्यातील साटेलोटे या प्रकरणातून उघड झाल्याचंही त्या म्हणाल्या. ही आत्महत्या नाही, ही व्यवस्था आणि राजकीय दबावाखाली झालेली हत्या आहे, असा गंभीर आरोप वर्षा गायकवाड यांनी केला.

या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले आहे. फडणवीस फलटणला गेले आणि रणजीतसिंह निंबाळकर यांना अभय दिलं. त्यांना क्लीन चिट देण्याची सवय लागली आहे. एक माजी भाजप खासदार वाचवण्यासाठी प्रशासनाचा गैरवापर केला जातोय, असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केला की, तुम्ही कोणाला वाचवत आहात? तुम्ही न्यायाधीश कसे झालात? चौकशीचं काम ज्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केलं त्यांनाच का दिलं? या प्रश्नांमुळे राजकीय वातावरणात ताप निर्माण झाला आहे. फडणवीस यांनी या प्रकरणी माफी मागावी आणि उच्चस्तरीय चौकशी आदेशित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वर्षा गायकवाड यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही धारेवर धरले आहे. त्या दोन तास पोलिसांसोबत चर्चा करतात, पण पीडित तरुणीच्या पालकांशी का बोलत नाहीत? असा सवाल त्यांनी केला. राज्य महिला आयोगाचं पहिलं कर्तव्य म्हणजे महिलांना न्याय मिळवून देणं, पण इथे मात्र तेच राजकीय दबावाखाली वागत आहे, असं त्यांनी म्हटलं. त्यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून किंवा न्यायालयीन समितीकडून करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण केवळ एका मुलीच्या मृत्यूचं नाही, तर संपूर्ण प्रशासनाच्या पतनाचं उदाहरण आहे, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!