ध्यास विश्वसार्ह बातमीचा

साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी !

सातारा : वृत्तसंस्था

सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपने खासदार उदयनराजे भोसले यांना मंगळवारी उमेदवारी जाहीर केली. साताऱ्यात विद्यमान खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्याने अजित पवार गटाने या मतदारसंघावर दावा केला होता. मात्र, उदयनराजे यांनी दिल्लीत पाच दिवस तळ ठोकून आपली उमेदवारी पक्की केली होती. दुसरीकडे महाविकास आघाडीने कोल्हापुरातून शाहू महाराज यांना उमेदवारी दिल्याने उदयनराजेंना उमेदवारी आवश्यक असल्याचे भाजपने अजित पवारांना पटवून दिले. त्यानुसार उदयनराजेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

सातारा लोकसभा मतदारसंघावर भाजपचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे यांनी दावा केला होता. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही या मतदारसंघावर दावा होता. राष्ट्रवादीकडून आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील, शिवसेनेकडून (शिंदे) जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, तर भाजपकडून उदयनराजेंसह नरेंद्र पाटील इच्छुक होते. उदयनराजे यांचा २०१९ च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांनी लाखभर मतांनी पराभव केला होता. त्यानंतर भाजपने उदयनराजेंचे राज्यसभेवर पुनर्वसन केले. उदयनराजेंचा राज्यसभेचा आणखी दोन वर्षांचा कार्यकाळ आहे. पण आता भाजपने त्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे.

उदयनराजेंची लढत आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शशिकांत शिंदे यांच्याशी होईल. भाजपकडून उदयनराजे यांच्या उमेदवारीची तयारी होताच शरद पवारांनी चाणाक्षपणे शशिकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर केली. शिंदे हे अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात, तर उदयनराजे आणि अजित पवार यांच्यातील राजकीय कटुता सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे अजित पवारांचा गट शिंदे यांना मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!