मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यातील ठाकरे गटातील नेते व पदाधिकारी शिंदे गटाच्या मार्गावर असताना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी येत्या 20 व 25 तारखेला पक्षाच्या आमदार, खासदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीद्वारे उद्धव ठाकरे आपल्या नाराज नेत्यांची मनधरणी करून सत्ताधारी सत्ताधारी महायुतीचे कथित ऑपरेशन टायगर मोडून काढण्याचा प्रयत्न करणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने सध्या ठाकरे गटाचे नेते फोडण्याचा सपाटा लावला आहे. शिंदे यांच्या नेतृत्वात शनिवारी कोकणातील अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला. तत्पूर्वी, ठाकरे गटाच्या राजन साळवी यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. आता ठाकरे गटाचे चिपळूणचे आमदार भास्कर जाधव यांनी आपल्याला आपल्या क्षमतेनुसार काम करण्याची संधी मिळत नसल्याची ओरड केली आहे. त्यामुळे ते ही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या आमदार व खासदारांची बैठक बोलावली आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या खासदारांची येत्या 20 फेब्रुवारीला तर आमदारांची 25 फेब्रुवारी रोजी बैठक होईल. या बैठकीला स्वतः उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. पक्षातील अनेक पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडत असताना ‘मातोश्री’ने ही बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना आदित्य ठाकरे यांनी तिथे आपल्या खासदारांची बैटक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी पक्षनेतृत्वाच्या पूर्वपरवानगीशिवाय शिंदे गटाच्या कोणत्याही नेत्याच्या कार्यक्रमांना हजेरी न लावण्याची ताकीद दिली होती. यामुळे काही नेत्यांची मने दुखावल्याची चर्चा आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे केवळ कोकणच नाही तर राज्यभरातील ठाकरे गटाचे नेते व कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सत्ताधारी शिवसेना व भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे प्रमाण वाढले आहे. विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला तब्बल 57 जागा मिळाल्या, तर ठाकरे गटाला अवघ्या 20 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे पुढील 5 वर्षे विरोधात बसण्यापेक्षा शिंदेंच्या गटात जाऊन काळ – वेळ काढण्याची रणनीती अनेक नेत्यांनी आखल्याची माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आपल्या नेत्यांना रोखण्यासाठी चांगलेच सक्रिय झाले आहेत.