---Advertisement---

उद्धव ठाकरेंची मोठी रणनीती : एक जागा, पाच दावेदार; ठाकरे गटात राज्यसभेसाठी जोरदार लॉबिंग

By team
On: February 27, 2026 10:25 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : प्रतिनिधी

२०२६ मधील राज्यसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये उमेदवारीवरून अंतर्गत हालचाली वेगाने सुरू झाल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीतून राज्यसभेसाठी केवळ एकच जागा मिळण्याची शक्यता असल्याने तिन्ही पक्षांकडून आपापल्या उमेदवारासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. परिणामी ठाकरे गटात इच्छुकांची संख्या वाढून पक्षांतर्गत चुरस तीव्र झाली आहे.

विद्यमान खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह माजी खासदार राजन विचारे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. काहींनी आपली भूमिका थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविल्याचेही बोलले जाते.

दरम्यान, महाविकास आघाडी पातळीवरही या जागेवरून समन्वय साधावा लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकाच जागेसाठी तिन्ही पक्षांमध्ये राजकीय समीकरणे गुंतागुंतीची बनली आहेत.

ठाणे परिसरात ठाकरे गटाची ताकद पूर्वीइतकी राहिलेली नसल्याने त्या भागाला प्रतिनिधित्व देण्यासाठी राजन विचारे यांच्या नावाचा विचार व्हावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या सत्ताधारी गटाचे वर्चस्व असल्याने पूर्वीचा बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे इच्छुक असल्याचे सांगितले जाते. कोकणातील संघटन बळकट ठेवण्यासाठी विनायक राऊत यांचे नाव पुढे केले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वासमोर संतुलन राखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. अंतिम निर्णय महाविकास आघाडीच्या चर्चेनंतरच होणार असला तरी इच्छुकांकडून ताकद आजमावण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत.

राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी आदित्य ठाकरे यांना दोन वेळा निमंत्रण देण्यात आल्याचे सांगितले जाते; मात्र ते उपस्थित राहिले नाहीत. राज्यसभा जागा ठाकरे गटालाच मिळावी, यावर पक्ष ठाम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते; मात्र ठाकरे गटाच्या अनुपस्थितीमुळे आघाडीत सूक्ष्म तणाव असल्याचे संकेत मिळत आहेत.

महाराष्ट्रातून एकूण सात राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे. यामध्ये शरद पवार यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, खासदार धैर्यशील मोहन पाटील, प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. फौजिया खान यांचा समावेश आहे. त्यामुळे आगामी राज्यसभा निवडणूक राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार असून, उमेदवारीवरून सुरू असलेली अंतर्गत चुरस पुढील काही दिवसांत आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!