---Advertisement---

वाल्मीक कराड तुरुंगात… पण दहशत रस्त्यावर :तरुणाला हात जोडून माफी मागायला लावणारा व्हिडिओ व्हायरल

By team
On: August 9, 2025 10:18 AM
Follow Us:
---Advertisement---

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नसताना स्व.संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा सध्या कारागृहात असला तरी, बीड शहरातील त्याच्या टोळीची दहशत अजूनही कायम असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण, कराडविरोधात पोस्ट केल्यामुळे, हात जोडून माफी मागताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, तो तरुण हात जोडून मी वाल्मीक अण्णाच्या विरोधात कोणतीही पोस्ट करणार नाही, माझ्याकडून चूक झाली, असे म्हणताना दिसत आहे. विशेष म्हणजे, त्याला शिवीगाळ करून आणि दमदाटी करून हा माफीनामा जबरदस्तीने वदवून घेतल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येते. हा सर्व प्रकार वाल्मीक कराडच्या समर्थकांनी घडवून आणल्याची माहिती मिळत असून हा व्हिडिओ जुना असल्याची चर्चा आहे.

बीड शहरात अशा प्रकारचे गुन्हेगारी आणि दहशतीचे व्हिडिओ सातत्याने व्हायरल होत आहेत. टोळीचे समर्थन करणाऱ्या पोस्ट्स, शस्त्रांचा धाक दाखवणे, मारहाणीचे प्रसंग आणि अघोरी कृत्यांचे व्हिडिओ यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाल्मीक कराडला कारागृहात ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ मिळत असल्याचा आरोप यापूर्वीही झाला आहे. त्याच्या टोळीच्या वाढत्या हालचाली आणि महादेव मुंढे प्रकरणातील संबंधांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे.

हा व्हिडिओ बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नुकत्याच पार पडलेल्या दौऱ्यादरम्यान व्हायरल झाल्यामुळे या प्रकरणाने अधिकच वेग घेतला आहे. कारागृहात असतानाही टोळीची दहशत कायम ठेवणाऱ्या वाल्मीक कराडच्या समर्थकांना कोण रोखणार, असा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओतील धमकावणाऱ्यांचे चेहरे ओळखले गेले असले तरी, अद्याप त्यांच्याविरोधात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!