अक्कलकोट : मारुती बावडे
तालुक्यातील कडबगावचे सुपुत्र विजयकुमार पाटील यांनी आपल्या दिव्यांगात्वावर यशस्वीपणे मात करून एक आदर्श जीवन पद्धतीचा अंगीकार केलेला
आहे. योग, प्राणायाम व्यायाम, सूर्यनमस्कार व्यसनमुक्ती, विषमुक्त अन्नसेवन या कार्यासाठी त्यांनी आपले जीवन वाहून घेतलेले आहे.करो योग, रहो निरोग हे त्यांच्या जीवनाचे ब्रीदवाक्य बनले आहे.
दिव्यांग असूनही पदवीपर्यंतचे शिक्षण विजयकुमार पाटील यांनी पूर्ण केलेले आहे. कॉलेज जीवनापासूनच म्हणजे १९९५ पासून वडिलांच्या ऍग्रो इलेक्ट्रिकल्स व्यवसायात ते लक्ष घालत आहेत.सुरुवातीला महालक्ष्मी ट्रेडर्स या छोटीखाणी दुकानाचे आज महालक्ष्मी परिवाराच्या अनेक व्यवसायात रूपांतर होऊन नावारूपाला आणलेले आहे. त्याचबरोबर २०१० सालापासून व्यायाम, योगासने, प्राणायाम, व्यसनमुक्ती,बिषमुक्त अन्नसेवन आदी गोष्टी त्यांनी स्वतः आपल्या जीवनात आचरणात आणल्या आहेत व याबाबत प्रबोधनही ते नेहमी करत असतात.
अक्कलकोट तालुका व परिसरातील तरुण, युवक ,युवती,नागरिक महिला, आदींचे याबाबत प्रबोधन कार्य सातत्याने करत आहेत. अक्कलकोट तालुका व परिसरात योग,प्राणायाम, सूर्यनमस्कार, इत्यादींच्या मार्गदर्शन शिबिराचे अनेक वेळा त्यांनी यशस्वी आयोजन केलेले आहे. याच बरोबर विषमुक्त शेती हा विषय देखील त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे यासाठी आजवर त्यांनी अनेक शेतकरी प्रशिक्षण शिबिर वर्गाचे यशस्वी आयोजन केलेले आहे. या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन शिबिरामध्ये विशमुक्त शेती बरोबरच वैदिक जीवन पद्धतीचा अवलंब कसा करावा याबाबत ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात.शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन व्यायाम योगासने ,प्राणायाम यांचा अंगीकार जीवनामध्ये करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित करत असतात. वैदिक पतंजली सूत्रामध्ये प्रत्येक मानवाने आचरणात आणावित अशी दहा तत्वे ( दश आज्ञा) सांगितलेल्या आहेत सत्य, अहिंसा, अपरिग्रह, ब्रम्हचर्य, दया, क्रियायोग, क्षमा आहार, विहार या सर्व दशआज्ञायांचे पालन व अंगीकार विजयकुमार पाटील यांनी आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या जीवनात केलेला आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत भरपूर आहे.
आजपर्यंत त्यांच्या या कार्याची दखल अनेक संस्थांनी कडून घेण्यातआलेली आहे व त्यांना या कार्यासाठी विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.प्रत्येक मनुष्यमात्राने योग, प्राणायाम, व्यायाम, विषमुक्त अन्नसेवन व वैदीक दशआज्ञाचा अंगीकार आपल्या जीवनात केला तर हे आपले जीवन सुख समृद्धीने परिपूर्ण होईल,असे त्यांचे मत आहे.
रामदेव बाबा यांनी केले होते कौतुक
अक्कलकोटला ज्यावेळी योग गुरु रामदेव बाबा यांचे शिबिर झाले.त्या शिबिरावेळी देखील त्यांचा सक्रिय सहभाग होता.या कार्यक्रमात रामदेव बाबा यांनी विजयकुमार पाटील यांच्या योग कार्याबद्दल विशेष असे कौतुक केले होते. त्यावेळी त्यांची प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले होते.
आरोग्याकडे दुर्लक्ष नको
आरोग्य हीच संपत्ती आहे असे नेहमी म्हटले जाते.त्यात बऱ्याच वेळा आधुनिक जीवनशैलीमुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष होते परंतु विजयकुमार पाटील मात्र दररोज या गोष्टीसाठी वेळ राखून ठेवतात आणि ते आज तागायत ही सवय त्यांनी शरीराला लावून ठेवली आहे. त्यांचा आदर्श समाजाने घेण्यासारखा आहे.