---Advertisement---

आचेगाव येथे २ ते ९ जुलैदरम्यान ‘गाव संलग्नता’ प्रशिक्षण कार्यक्रम

By team
On: July 5, 2025 10:33 AM
Follow Us:
---Advertisement---

दक्षिण सोलापूर : नागनाथ विधाते

आगामी काळात ग्रामीण प्रशासनात कार्यरत होणाऱ्या नव्या अधिकाऱ्यांना गावपातळीवरील वास्तव अनुभव व व्यवहाराची प्रत्यक्ष ओळख होण्यासाठी ‘गाव संलग्नता’ (रूरल अॅटचमेंट) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २ ते ९ जुलै २०२५ या कालावधीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथे राबवण्यात येत आहे.

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) तुकडी क्रमांक १० अंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासंदर्भात मा. उपमहासंचालक तथा संचालक, ग्रामीण विकास सेवा, यशदा पुणे यांच्या पत्रानुसार आणि पंचायत समिती दक्षिण सोलापूरच्या सूचनेनुसार नियोजन करण्यात आले आहे.

सदर गाव संलग्नता कार्यक्रमासाठी यशदा पुणेने नियुक्त केलेल्या एकूण सहा प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची (पुरुष अधिकारी ४ व महिला अधिकारी २) नेमणूक आचेगावमध्ये करण्यात आली आहे. हे अधिकारी यशदा ठरवून दिलेल्या अभ्यासक्रम व मार्गदर्शक सूचनांनुसार गावात प्रत्यक्ष मुक्कामी राहून विविध शासकीय योजनांचे प्रत्यक्ष मूल्यांकन, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यपद्धती, ग्रामसभा, लोकसहभाग यासारख्या बाबींचा अभ्यास करतील.

या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण प्रभावीपणे पार पडावे यासाठी त्यांच्या उपस्थितीची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. यामुळे गाव प्रशासन, ग्रामपंचायत व स्थानिक अधिकारी यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. हा उपक्रम भविष्यातील सक्षम व अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्यांची पायाभरणी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यशदा पुणेच्या वतीने सांगण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!