मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते तर आता ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी देखील मुंडे यांचे समर्थन केले आहे. आमच्या ओबीसी समाजाच्या मंत्र्याला मीडिया ट्रायल द्वारे धमकावण्याचे काम होत असेल तर महाराष्ट्रातील ओबीसी आणि बहुजन समाज त्या मंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे हाके यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर नेत्याच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा दावा देखील हाके यांनी केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा अप्रत्यक्षपणे संबंध असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या संदर्भात मंत्री धनंजय मुंडे यांच्या खात्यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत त्यांनी राजीनाम्याची मागणी देखील केली आहे. मात्र, या विरोधात आता ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेतली आहे. जालना दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी राज्यातील ओबीसी नेत्यांविरुद्ध षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप हाके यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांचे नाव अंजली दलालिया ठेवायला हवे. त्या निवडक नेत्यांची प्रकरण उकरून काढतात आणि त्यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करतात. हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम असल्याचा आरोप प्रा. हाके यांनी केला आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत अंजली दमानिया यांनी जेवढी प्रकरण काढली, त्या प्रकरणांचे पुढे काय झाले? हे महाराष्ट्राला माहिती आहे. दमानिया केवळ मीडियात स्पेस शोधण्याचा काम करतात. त्यांना कोणीही गांभीर्याने घेऊ नये, असे देखील लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.