---Advertisement---

‘आम्ही दोनदा फसलो, आता फसणार नाही ; ठाकरें बंधूंच्या युतीवर प्रश्नचिन्ह

By team
On: May 24, 2025 5:50 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृतसंस्था

गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या होता. पण मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या हेतूवर सवाल उपस्थित करत ‘आम्ही दोनदा फसलो, आत्ता तिसऱ्यांदा फसणार नाही’ असे ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसेच्या बहुचर्चित युती होणार किंवा नाही? याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच एका डिजिटल वाहिनीला मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी युतीसंबंधीच्या आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला होता. संदीप देशपांडे यांनी त्यांच्या या विधानाचा दाखला देत ठाकरे गटासोबत अजून कोणताही संवाद झाला नसल्याचे स्पष्ट केले.

ते म्हणाले, आमच्या मनात युतीविषयी शंका आहे. रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन आम्ही सकारात्मक आहोत असे बोलायचे त्याला अर्थ नाही. खरेच युती करायची असेल तर 4 पाऊले पुढे आले पाहिजे. मनसेतर्फे मी सांगतो की, ठाकरे गटासोबत अजून कोणताही संवाद झाला नाही. आम्ही जे काही सुरू आहे ते केवळ संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेमार्फतच पाहत आहोत. आम्हाला जेव्हा युती करायची होती, तेव्हा आम्ही माणूस पाठवला होता. आमची जी इतर लोकांसोबत नाती आहेत, ती आहेत. आम्ही काहीच लपवत नाही.

हे लोक युतीची मुद्दाम हवा निर्माण करत आहेत. त्यांनी यापूर्वीही असेच केले होते. केवळ सकारात्मक बोलून युती होत नसते. आम्ही यापूर्वी स्वतः बाळा नांदगावकर यांना मातोश्रीवर पाठवले होते. सध्या आमच्याकडून पडद्यामागून किंवा पडद्यापुढून कोणताही संवाद सुरू नाही. आम्ही सर्वांसोबत बोलतो. शरद पवारांसोबतही आम्ही बोलतो. आत्ता आम्ही जर-तरच्या प्रश्नांना उत्तर देणार नाही. त्यांनी काय तो प्रस्ताव पाठवावा. दोनदा फसल्यावर माणूस तिसऱ्यांदा फसत नाही, असे ते म्हणाले.

उल्लेखनीय बाब म्हणजे संजय राऊत यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीवर भाष्य केले होते. राज ठाकरे यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमुळे युतीचा विषय चर्चेला आला असे मी मानत नाही. उद्धव ठाकरे यांनीही एका कार्यक्रमात त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. पण युतीची चर्चा अशी मुलाखतीतून ठरत नाही. राज ठाकरेंच्या मुलाखतीपेक्षा प्रत्यक्षात काय सुरू आहे? हे आम्हाला माहिती आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, आम्ही सगळे राज ठाकरे यांच्यासोबत नाते जोडण्यास सकारात्मक आहोत, असे ते म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांची मराठी माणसासाठी सर्वकाही बाजूला ठेवून एकत्र यावे लागेल अशी भूमिका आहे. त्यांची आमच्याशी चर्चा झाली आहे. कालही आम्ही बोललो. आपण मनसेसंदर्भात सकारात्मक पाऊल टाकण्यास हरकत नाही ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका मनसे व दिलसे आहे. मराठी माणसासाठी एकत्र येणे हीच खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना ठरेल, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले होते.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!