सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील सोलापूर शहरातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते व सोलापूरचे महानगरपालिकेचे माजी महापौर महेश कोठे(वय ५९) यांना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ते नेते असून सोलापुरातील एक मोठे राजकीय वजनदार व्यक्तीमत्व त्यांना मानले जाते. महेश अण्णा कोठे यांचे हृदयविकाराचा झटका आल्याने प्रयागराज येथे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
नुकत्याच विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली होती. महापालिकेमध्ये महेश कोठे यांच्या नावाचा मोठा दबदबा होता. महेश कोठे यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी, नातू असा परिवार आहे. माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांचे ते वडील असून नूतन भाजप आमदार देवेंद्र कोठे यांचे ते चुलते होते.
मिळालेल्या माहितीनुसार महेश कोठे हे प्रयागराज येथे त्यांच्या काही मित्रांसोबत कुंभमेळ्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले. थंडीमुळे रक्त गोठल्याने त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी नेते महेश कोठे यांच्या अकाली निधनामुळे राजकीय तसेच सामाजिक आणि शैक्षणिक वर्तुळामध्ये मोठा शोक व्यक्त केला जात आहे.
विष्णुपंत उर्फ तात्या कोठे यांचे महेश कोठे हे पुत्र असून तात्या कोठे यांच्या पासून सोलापूर महानगरपालिकेवर तीस वर्षाहून अधिक काळ कोठे घराण्याचे वर्चस्व होते. कोठे बोले आणि महापालिका हाले असे वाक्य त्यांच्या बाबतीत अनेक जण बोलत असत. नगरसेवक प्रथमेश कोठे यांचे ते वडील होत. तर शहर मध्य चे नूतन आमदार देवेंद्र कोठे यांचे ते काका होते. महेश कोठे यांचे पार्थिव विशेष विमानाने सोलापुरात आणणार असून राज्यातील दिग्गज नेते आमदार,खासदार यावेळी उपस्थित राहणार आहेत.