---Advertisement---

“हवेत पतंगबाजी कशाला?”: राष्ट्रवादी विलीनीकरणावर फडणवीसांची स्पष्ट भूमिका

By team
On: February 10, 2026 4:12 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. “राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्या प्रक्रियेशी माझा थेट संबंध नाही. पक्षांतर्गत निर्णय झाल्यानंतर ते महायुतीपुढे प्रस्ताव घेऊन आले, तरच यावर बोलणे योग्य ठरेल. तोपर्यंत हवेत पतंगबाजी कशाला?” असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कथित दिल्ली दौऱ्यानंतर तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याच्या वृत्तामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. मात्र, या चर्चांवर फडणवीस यांनी संयमित भूमिका घेत अफवांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले होते. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून विलीनीकरण अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत देण्यात आले होते. खुद्द शरद पवार यांनीही तसे विधान केले होते. विलीनीकरणाची तारीखही ठरल्याचे त्यांनी सांगितले होते. अशातच सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्याच्या चर्चेमुळे पुन्हा राजकीय हालचालींना वेग आला आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर झालेली ही मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक होती. उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांचीही ही पहिली मंत्रिमंडळ बैठक होती. दुखवट्यामुळे औपचारिक स्वागत न करता शब्दसुमनांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. “अजित पवार यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मार्गानेच सुनेत्रा पवार काम करतील,” अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच शोक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. “सुनेत्रा पवार यांनी अत्यंत संयमाने जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पक्ष आणखी यश मिळवेल,” असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. दरम्यान, चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर झाल्याची माहिती मिळाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मात्र, त्यामागील राजकारणाची सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “भाजपचा महापौर झाल्याचा आनंद आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन,” असेही ते म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!