ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आपली माणसं मारून टाकणार्‍याचं का तोंड बघायचं? जरांगे पाटील धसांवर बरसले !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह भाजपचे आ.सुरेश धस एकाच व्यासपीठावरून मंत्री मुंडे यांना कोंडीत पकडत असतांना नुकतेच शुक्रवारी आ.धस यांनी चक्क मंत्री मुंडे यांची भेट घेतल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. धस-मुंडे भेटीवर आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

राजकीय मंचावरील हे ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ प्रेमाचे नाट्य पाहून सर्वसामान्य नागरिकांनी तोंडात बोटे घातली. ही भेट म्हणजे एक षड्यंत्र असल्याचे स्पष्ट दिसते, अशी जोरदार टीका जरांगे टापील यांनी या भेटीवर केली आहे.

धस-मुंडे भेटीवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, ज्या लोकांनी टीका केली, ज्या लोकांनी यांची राजकीय कारकीर्द बरबाद करायचं असं ठरवलं, असं तेच म्हणाले. यांनी तिथंच भेटायला जाणं… आपली माणसं मारून टाकणार्‍याचं का तोंड बघायचं? इतक्या क्रूर माणसाला तुम्ही भेटायला जाता, ज्याच्या लोकांनी खून घडवून आणला. त्यांना एकदाही देशमुख कुटुंबाकडे यावं नाही वाटलं?

संतोष देशमुखांचे कुटुंब उघड्यावर आहे आणि सुरेश धस त्यांच्या स्वार्थासाठी इकडे-तिकडे फिरत आहेत. हा विश्वासघात आहे. हे शंभर टक्के षडयंत्र असल्याचे दिसत आहे. यांना आरोपी सोडून द्यायचे आहे. देशमुख प्रकरणातील एकही आरोपी सुटला तर सरकारपेक्षा धस जबाबदार राहतील, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली.

त्यांनी माणसं कापून टाकली आहेत, त्यांना भेटायला जाता? मराठ्यांनी तुमच्यावर विश्वास टाकला. गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या तोंडात माती कालवता का? यांना फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवर वार करायचे होते. जर सुरेश धस भेटले असतील तर शंभर टक्के गोरगरीब मराठ्यांच्या काळजावर त्यांनी वार केला आहे, असेही या भेटीवर बोलताना ते म्हणाले. दरम्यान, धनंजय मुंडे – सुरेश धस यांची भेट घडवून आणण्यासाठी मध्यस्थी केल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती. त्यानंतर धस यांनी देखील ही भेट झाली असल्याचा खुलासा केला. एकीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना अचानक ही भेट झाल्याने जोरदार चर्चा रंगली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!